दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | मुंबई | महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीस माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.
‘माविम’मध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करणे, तेजस्विनी उपक्रमा दरम्यान १० टक्के असलेली वेतनवाढ कमी करुन ३ टक्के करण्यात आली होती. नवतेजस्विनी अंतर्गत पुन्हा १० टक्के वाढ लागू करणे आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. महिला ब बाल विकास विभाग या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असून हे विषय पूर्णत्वास नेणे बाबत संबंधितांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश यावेळी ॲड.ठाकूर यांनी दिले.