
स्थैर्य, भाडळी बु., दि. २० ऑक्टोबर : भाडळी बुद्रुक येथील मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला मिळालेल्या रास्त भाव धान्य दुकानाचा शुभारंभ दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात आला. निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांच्या हस्ते धान्य वाटप सुरू करण्यात आले, ज्यामुळे गावातील, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची रेशन धान्यासाठी इतरत्र जाण्याची गैरसोय दूर होणार आहे.
यावेळी बोलताना सोनवणे यांनी संस्थेच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. सर्वसामान्यांच्या अडचणी लक्षात घेऊन संस्थेने प्रभावीपणे काम केले असून, रास्त भाव धान्य दुकानाचे कामही संस्था तितक्याच काटेकोरपणे करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी संबंधित विभागाकडून संस्थेला संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार तुषार गुंजवटे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर-पाटील आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे माजी संचालक महादेव गुंजवटे यांनीही मनोगत व्यक्त करून संस्थेच्या नवीन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी, संस्थेचे संस्थापक-चेअरमन आणि फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे निमंत्रित संचालक मोहनराव डांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गावातील ज्येष्ठ आणि वयस्कर नागरिकांना रेशन धान्यासाठी इतर गावी जावे लागत होते, त्यांची ही हेळसांड आणि गैरसोय थांबवण्यासाठी गावातच ही सोय उपलब्ध व्हावी, यासाठी संस्था अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होती, असे डांगे यांनी सांगितले.
संस्थेने गतवर्षी शंभर टक्के कर्ज वसुली केली असून, सहकार विभागाच्या धोरणानुसार हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे, असेही त्यांनी नमूद केले. या रास्त भाव दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी फलटण तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
या शुभारंभ कार्यक्रमास भाडळीचे पोलीस पाटील हनुमंत (बापू) सोनवलकर, गुलाबराव डांगे, तुषार मुळीक, सचिन सोनवलकर, संभाजी डांगे, दत्तात्रय सावंत, पंडित मुळीक, बाळासो शेंडे, धोंडीबा मुळीक, दत्तात्रय डांगे, अर्जुन डांगे, वसंतराव डांगे, राजकुमार सावंत, शिवराम डांगे, चंद्रकांत डांगे, महादेव जाधव, सोमनाथ डांगे, यशवंत पवार, विजय घाटे, ॲड. प्रविण डांगे, रजत डांगे, अनिकेत डांगे, हर्षद डांगे, सुरज गोरे, गणेश डांगे, नटराज साळवे, प्रसाद माने, धर्मेंद्र शिरतोडे, ऋषीकेश मुळीक, सौरभ मुळीक, प्रमोद शिरतोडे, हर्षल सावंत यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी संदीप (बापू) शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.