भाडळीच्या ‘मातोश्री’ सोसायटीचा ‘भन्नाट’ उपक्रम! दिनदर्शिकेतून जपली सामाजिक बांधिलकी


भाडळी बु. येथील मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीने २०२६ ची आगळीवेगळी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. केवळ तारखा न छापता सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडणाऱ्या या उपक्रमाचे सातारा जिल्हा बँकेचे अधिकारी अजित निंबाळकर यांनी विशेष कौतुक केले.

स्थैर्य, भाडळी बु., दि. ०८ जानेवारी : केवळ कर्जपुरवठा आणि आर्थिक व्यवहार यापुरते मर्यादित न राहता, सहकारी संस्थांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी, याचा आदर्श भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील ‘मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी’ने घालून दिला आहे. संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमाचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्री. अजित निंबाळकर यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

मातोश्री सोसायटीने प्रकाशित केलेल्या या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ वार्षिक पंचांग, सण आणि उत्सव यांची माहिती नाही. तर मातोश्री संस्था समूह, जाणता राजा प्रतिष्ठान आणि नेहरू युवा मंडळ यांच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी आणि ग्रामविकासाच्या कामांचा सविस्तर आढावा यात मांडण्यात आला आहे.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे श्री. अजित निंबाळकर म्हणाले, “सहकारी संस्थांनी केवळ आर्थिक ताळेबंद न जुळवता समाजाशी नाळ जोडणे गरजेचे असते. मातोश्री सोसायटीने दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा पारदर्शक लेखाजोखा मांडून आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन एक स्तुत्य पायंडा पाडला आहे. हा उपक्रम इतर संस्थांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.”

या प्रकाशन सोहळ्यासाठी मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे संस्थापक चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष निमंत्रित श्री. मोहनराव डांगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. संतोष जगताप, सोसायटीचे संचालक श्री. दत्तात्रय डांगे, जिल्हा बँकेचे वसुली अधिकारी श्री. प्रविण ढेंबरे, श्री. रामभाऊ नाळे, श्री. विकास अभंग, श्री. महेश दळवे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे भाडळी परिसरातील सहकार क्षेत्रात मातोश्री सोसायटीच्या कामाचे विशेष कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!