दैनिक स्थैर्य | दि. ०३ फेब्रुवारी २०२५ | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे गुणवत्ता हमी कक्ष, महिला अभ्यास केंद्र, महिला विकास समिती व लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने “माता पालक मेळावा” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सुनिता निंबाळकर, भूलतज्ज्ञ, उपस्थित होत्या.
संक्रांतीच्या हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश माता-पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी करणे व त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल जागृती निर्माण करणे हा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत पालकांचा सहभाग कमी असतो, याची दखल घेत मुधोजी महाविद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम सर यांनी भूषविले. डॉ. सुनिता निंबाळकर यांनी महिलांचे मानसिक आरोग्य, वयानुसार बदलणारी मानसिक स्थिती, मानसिक दृष्ट्या सशक्त राहण्यासाठी करायचे जीवनशैली बदल, व्यायाम, सकस आहार, वैचारिक बदल या विषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “महिला केवळ शारीरिक दृष्ट्याच नाही, तर मानसिक दृष्ट्याही स्वस्थ असाव्यात.” कुटुंबाचा कणा बनून कुटुंब सांभाळणाऱ्या महिलांना त्यांनी “Domestic Engineer” अशी पदवी देऊन गौरविले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या स्त्री अभ्यास केंद्राद्वारे माता-पालकांचे स्वागत करण्यात आले. त्यांना संक्रांतीचे वाण म्हणून पुस्तकरूपी भेट देण्यात आली. लायन्स क्लबच्या अध्यक्ष सौ. स्वाती चोरमले, सौ. संजिवनी कदम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ सिता जगताप, पाहुण्यांचा परिचय प्रा. निलम देशमुख, तर आभार सौ उमा भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ प्रा. गायत्री पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयाचे स्त्री अभ्यास केंद्र व महिला विकास समिती विद्यार्थीनीच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक उपक्रम राबिवित आहेत. फलटण तालुक्याच्या परिसरातील गुणवंत महिलांचा गौरव करण्यासाठी विजयमाला पुरस्कार प्रदान करीत आहे. या कार्यक्रमाने माता-पालकांमध्ये मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करण्यात मदत झाली आहे.