कराड तालुक्यात मसूर ग्रामपंचायत पावसाळ्यात होणार्‍या साथरोगाच्या दृष्टीने सतर्क

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. १९ : कराड तालुक्यात मसूर ग्रामपंचायत पावसाळ्यात होणार्‍या साथरोगाच्या दृष्टीने सतर्क झाली असून कीटकजन्य  साथरोग प्रतिबंध उपाययोजनेसाठी घराघरात पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत असून मेडिक्लोर बाटल्यांचेही वाटप केले आहे.

सरपंच पंकज दीक्षित यांनी ग्रामस्थांना पत्रकाद्वारे आवाहन करताना,  ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील सर्व गटारे वाहती केली आहेत तसेच बीएससी पावडर टाकून मच्छरांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. पावसाळ्यात डासांमुळे पसरणार्‍या रोगामध्ये हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकुन गुनिया, जपानी मेंदूज्वर ही सध्या जनतेच्या दृष्टीने मोठी गंभीर समस्या बनली आहे. हिवताप हा रोग प्लाझमोडियम नावाच्या परोपजीवी जंतूमुळे होतो व त्याचा प्रसार नाफिलीस डासाच्या मादी मार्फत होतो. हत्तीरोग परोपजीवी कृमींमुळे, तर जपानी मेंदूज्वर विषाणूमुळे होतो. या दोन्ही रोगांचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. डेंग्यू व चिकुन गुनिया हे दोन्ही आजार विषाणूंमुळे होतात व एडीस इजिप्ती प्रकारच्या डासांमुळे त्याचा प्रसार होतो.

या रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत असणार्‍या डासांची निर्मिती घर व घराच्या आजूबाजूचा परिसर गाव व गावाच्या आजूबाजूच्या परिसरात होत असते. डासांची निर्मिती स्वच्छ तसेच घाण पाण्यात होत असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने उत्तप डेंग्यूचे प्रमाण आपल्या गावात कमी होईल. त्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करावीत. पाण्याच्या भांड्यामध्ये डास जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.  आठवड्यातून एक दिवस मंगळवार कोरडा दिवस पाळावा. पाणी साठवण्याच्या भांड्यांना घटक चाचणी बसवावीत. घराच्या परिसरात पडलेल्या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी. परिसरात स्वच्छता ठेवावी. घरातील कूलर, फ्रीजचा ड्रीपपॅन नियमित स्वच्छ करावा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळावा.

तसेच गटारे वाहती करावीत. छोटे छोटे खड्डे व डबकी मुजवावीत सांडपाण्यासाठी शोष खड्डे तयार करावेत. साठवण राहिलेल्या निरुपयोगी पाण्यावर जळके ऑईल किंवा रॉकेल टाकावे. शौचालयाच्या सेप्टीक टँकच्या वेंट पाइपला जाळी बसवावी.  झोपताना डास चावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ताप उद्रेकग्रस्त गावातून आलेल्या रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार घेण्यासाठी पाठवावे. मोठ्या पाण्याच्या साठ्यात उदाहरणार्थ तलाव, डबकी,  ओढे, मोठे हौद यामध्ये डासांच्या अळ्या खाणारी गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे सर्व आरोग्य संस्थांच्या ठिकाणी मोफत उपलब्ध होतात. हे सर्व उपाय प्रत्येक नागरिकांनी केल्यावरती हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुन गुणिया, जपानी मेंदूज्वर या रोगांच्या समस्येवर मात करू शकू.

नागरिकांनी सर्व सूचनांचे पालन करून पावसाळ्यामध्ये होणारे साथीचे आजार टाळूया असे, आवाहन सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी यांनी केले आहे.

डासांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे अजून गावांमध्ये फवारणी करण्यात आली नाही. परंतु भविष्यात फवारणी करून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करणार आहे.   – पंकज दीक्षित सरपंच, ग्रामपंचायत, मसूर


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!