
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑगस्ट : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नीरा नदीच्या पाणी विसर्गात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वीर, भाटघर आणि नीरा देवघर या प्रमुख धरणांमधून मिळून तब्बल ७२,२४७ क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नीरा नदीने धोक्याची पातळी गाठली असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. प्रशासनाने नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, नीरा नदीतील एकूण विसर्गापैकी सर्वाधिक ४८,५३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग एकट्या वीर धरणातून सुरू आहे. त्यापाठोपाठ भाटघर धरणातून १२,९०० क्युसेक्स आणि नीरा देवघर धरणातून १०,८१५ क्युसेक्स पाणी नदीत सोडले जात आहे. या एकत्रित पाण्याच्या प्रवाहामुळे नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत वीर, भाटघर आणि नीरा देवघर ही तिन्ही धरणे १००% क्षमतेने भरलेली आहेत, तर गुंजवणी धरणातील पाणीसाठा किंचित कमी होऊन ८८.८९% झाला आहे. नीरा प्रणालीतील एकूण पाणीसाठा सध्या ९९.१५% इतका आहे.
नदीपात्रातील पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीच्या पाण्यात उतरू नये, आपली गुरेढोरे, वाहने आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने दिल्या जात आहेत. दरम्यान, फलटण तालुक्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे शेतीसाठी नीरा उजवा कालव्यातून १,३८६ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे, ज्यामुळे पिकांना फायदा होणार आहे.

