
स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : सातारा तालुक्यातील कोडोली येथील पारधी समाजाच्या वस्तीत रविवारी दुपारी अचानक भडकलेल्या भीषण आगीमध्ये झोपडीतील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अंदाजे 15 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अचानक धुराचे लोट या प्रसारात दिसताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ सातारा पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर अग्निशमन दलाने तत्परतेने बचावकार्य सुरू केले. त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरून आणखी झोपड्या आगीच्या भक्षस्थानी जाण्यापासून वाचल्या आहेत.
ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अचानक भडकलेल्या या आगीमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. याबाबतचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

