
दैनिक स्थैर्य । 2 एप्रिल 2025। सातारा । येथील जुन्या एमआयडीसीमध्ये व्यंकटेश कुरिअरच्या गोडाऊनला आग लागून संगणक साहित्य कुरिअर पार्सल रोख रक्कम सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. गोडाऊनच्या टपाल कक्षामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, कुरिअरसह लॉजिस्टिक पार्सल सुद्धा जळाल्याने संबंधित कुरिअर मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. नितीन साळुंखे रा. सातारा असे संबंधित मालकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, गोडाऊनला आग लागण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. यानंतर अग्निशमन दलाने तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. गुढीपाडव्याच्या सणामुळे गोडाऊनमध्ये कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हता गोडाऊनच्या अगदी बाहेरील बाजूमध्ये पहाटे अडीचच्या दरम्यान पार्सल विभागाला आग लागल्याची बाब वॉचमनच्या लक्षात आली.
वॉचमनने तातडीने अग्निशमन यंत्रणेला फोन फिरवला. मात्र, तोपर्यंत आगीने भीषण रूप धारण केल्याने गोडाऊनमधील संगणक साहित्य, वजन काटा मशीन तसेच महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रोख रक्कम जळून खाक झाली. वेगवेगळ्या कंपन्यांचा पार्सल माल सुद्धा जळाल्याने व्यंकटेश कुरिअरची कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दुर्घटनेची बाब कळताच व्यंकटेश कुरिअर चे संचालक नितीन लोखंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आगीच्या ज्वाळांमुळे गोडाऊनचा पत्रा जळून खाक झाला सुमारे 48 तास ही आग धुमसत होती. अग्निशमन दलाच्या पाच जवानांनी तीन तास पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
या आगीमध्ये 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या आगीमुळे गोडाऊनच्या भिती काळ्या ठिक्कर पडल्या होता.