स्थैर्य, फलटण, दि. ०९: फलटण (जि.सातारा) येथील ज्येष्ठ, हरहुन्नरी, आनंदी कवी अशोकराज दीक्षित यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 65 व्या वर्षी (दि.12 एप्रिल 2021 रोजी) निधन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेसह विविध कवी संमेलनांमधून कवी अशोकराज दीक्षित यांनी कवी मनाची छाप आपल्या काव्यांद्वारे उमटवली होती. त्यांच्या अकाली निधनाबद्दल साहित्य वर्तृळातून हळहळ व्यक्त होत असून यातील काही प्रातिनिधीक भावना.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने शोक व्यक्त करताना मसापचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘ज्येष्ठ कवी अशोकराज दीक्षित यांचे आपल्यातून जाण्याचे वृत्त समजल्यावर पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र साहित्य परिषद एका हरहुन्नरी, आनंदी कवीला मुकली आहे. अशोकराज दीक्षित यांच्याकडे निसर्गदत्त आवाजाची देणगी होती. कोणत्याही कार्यक्रमात कधीही मानापानाची अपेक्षा न ठेवता ते श्रोत्याच्या भूमिकेत सहज रमून जायचे. कवीता सादर करताना श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव ते अचूक घ्यायचे. हळव्या मनाचा, शांत स्वभावाचा, चेहर्यावर नेहमी हास्य असणार्या आगळ्यावेगळ्या कवीला आपण मुकलो आहोत.’’
अशोकराज दीक्षित यांच्याबद्ल आपल्या आठवणी सांगताना मसाप फलटण शाखेचे कार्यवाह ताराचंद्र आवळे सांगतात, ‘‘अशोकराज दीक्षित हे अनेक नवकवींचे प्रेरणास्त्रोत होते. रुबाबदार पेहराव, मिशी, भारदस्त शरीर, चेहर्यावर हास्य व कवीतेतील मिश्किली श्रोत्यांना विशेष भावत असे. ‘डोक्यावर गोल टोपी व भारदस्त मिशी’ ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांच्यासोबत अनेक कवी, साहित्य संमेलने आयोजित केली.ते नेहमी म्हणत, ‘मला कवीता सादर करायला नाही मिळाली तरी चालेल, पण कवीता ऐकायला मिळाल्या की महिना – दोन महिने चांगले जातात.’ एवढे त्यांचे कवीतेवर प्रेम होते. त्यांच्या मिशी, वार्धक्यातील प्रेम, प्रियसी ते पत्नी, जीवन, कविता, भिशी अदी कवितांनी रसिकांना वेड लावले होते. भविष्यात त्यांची उणिव मला नेहमी भासेल.’’
पांचगणी (जि.सातारा) येथील ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करतात, ‘‘कवी अशोकराज दीक्षित यांच्या काव्यात हळूवारता होती. शब्दा शब्दात ते व्यक्त होत तेव्हा त्यांच्या काव्य रचनेतील प्रगल्भता जाणवू लागे. त्यांच्या जाणेने साहित्य क्षेत्रात मोठी उणीव निर्माण झाली आहे.’’
खंडाळा (जि.सातारा) येथील ज्येष्ठ साहित्यिक विलास वरे आपल्या शोक संदेशात म्हणतात, ‘‘फलटण येथील कवी अशोकराज दीक्षित यांनी आमच्याबरोबर अनेक कवि संमेलनांमध्ये भाग घेतला होता. अजनूज येथील राज्यातील पहिल्या ‘शिवार साहित्य संमेलना’मध्ये त्यांची ‘मिशी’ ही कविता खूपच गाजली. त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.’’
‘‘अशोकराज दीक्षित हे बहूआयामी कर्तृत्त्वाने नटलेले एक व्यक्तीमत्त्व. कारण त्यांच्या नावातच राज लपलेले आहे. कवी, लेखक, पत्रकार, समीक्षक, संगीततज्ज्ञ, सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता असा हा एक अवलिया म्हटलं तर वावग ठरणार नाही. एक – दोन भेटीतच त्यांनी मला आपलस करुन टाकलं होत. त्यांना माझ्यावतीने पुष्पांजली’’, अशा शब्दात किन्हई, जि.सातारा येथील शाहीर दामु किन्हईकर आपल्या भावना व्यक्त करतात.
भुईंज (जि.सातारा) येथील ज्येष्ठ कवी गंगाराम कुचेकर, ‘‘जीवाभावाचा अशोकराज यांची ‘मिशी’ ही कविता नेहमी ऐकावी वाटायची. इतक्या लवकर त्यांची जीवनयात्रा संपेल असे वाटले नव्हते. आनंदी, उत्साही, सर्वांशी स्नेहाने वागणारे व्यक्तीमत्त्व हीच त्यांची खास ओळख. त्यांचे सोडून जाणे चटका लावणारे आहे’’, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण करतात.
मर्ढे (जि.सातारा) येथील तरुण कवी अजित जाधव आदरांजली वाहताना म्हणतात, ‘‘अशोकराज दीक्षित म्हणजे राजा मनाचा दादा माणूस. कोणत्याही संमेलनात त्यांची कवीता ऐकल्याशिवाय संमेलन अपुरे वाटायचे. विनोदी व वैचारिकेची किनार असलेला कवितांचा बादशहा म्हणून त्यांचा नेहमी आदर वाटायचा.’’
फलटण येथील युवा कवी अविनाश चव्हाण श्रद्धांजली अर्पण करताना म्हणतात, ‘‘अशोकराज दीक्षित सरांचे अचानक सोडून जाणे ही पोकळी कशानेच भरुन निघणार नाही. त्यांच्या कवितांनी काव्य रसिकांच्या मनावरती अक्षरश: अधिराज्य केले. विशेषत: ‘वार्धक्यातील प्रेम’ आणि ‘मिशी’ या कविता खूप गाजल्या. अशा या कविराजास आमचा मानाचा मुजरा.’’