दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२५ | सातारा | महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रयत्नातून, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी रहिमतपूर येथे त्यांचा अर्धपुतळा उभारला गेला आहे. या अर्धपुतळ्याचे अनावरण रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. हा अर्धपुतळा प्रा. कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून हा अर्धपुतळा उभारला गेला आहे. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी रहिमतपूर येथे हा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे. रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांचा जन्म रहिमतपूर येथे झाला होता आणि त्यांचे वडील निसर्ग कवी गिरीश होते. उच्च शिक्षण दरम्यान त्यांना वि.स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक वि.कृ. गोकाक या दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले होते. मराठीतील गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर आणि पाश्चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर यांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता.
प्रा. कानेटकरांनी ‘वेड्याचं घर उन्हात’ या पहिल्या नाटकापासून एकूण ४२ नाटके लिहिली. त्यांच्या काही उल्लेखनीय नाटकांमध्ये ‘प्रेमा तुझा रंग कसा?’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मत्स्यगंधा’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘मला काही सांगायचंय’ आणि ‘हिमालयाची सावली’ यांचा समावेश होतो. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकास राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते. मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
एक वर्षापूर्वी, शाहुपुरी शाखेने कविवर्य बा.सी. मढेकर यांच्या घराचे स्मारकात रूपांतर केले होते. या पुतळ्याच्या अनावरण समारंभात आमदार मनोज घोरपडे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, अरुण कानेटकर, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडकिहाळ, धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने, चित्रलेखा माने-कदम, सचिन बेलागडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.