मारूल तर्फ पाटणमध्ये अज्ञाताने लावलेल्या वणव्यात ६०० फळझाडे खाक; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान


पाटण तालुक्यातील मारूल तर्फ पाटण येथे अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक लावलेल्या वणव्यात प्रभाकर सूर्यवंशी यांची आंबा, नारळ आणि सुपारीची ६०० हून अधिक फळझाडे जळून खाक झाली आहेत.

 स्थैर्य, पाटण, दि. १ एप्रिल : कोयना विभागातील मारूल तर्फ पाटण येथील प्रभाकर राजाराम सूर्यवंशी यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीकडून रविवारी लावण्यात आलेल्या वणव्यामुळे फळबाग पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीत आंबा, फणस, सुपारी आणि चिक्कूची सुमारे ६०० हून अधिक झाडे नष्ट झाली असून, संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कष्टाने फुलवलेली बाग एका दिवसात राखेत

प्रभाकर सूर्यवंशी यांनी तीन वर्षांपूर्वी मोठ्या कष्टाने ही बाग उभारली होती. सध्याच्या चैत्र महिन्यात आलेल्या नवीन पालवीमुळे ही बाग हिरवीगार आणि बहरलेली दिसत होती. मात्र, अज्ञाताने लावलेल्या वणव्यामुळे एकाच दिवसात संपूर्ण बाग राखेत परिवर्तित झाली आहे. या भीषण आगीत केवळ झाडेच नव्हे, तर लाखो रुपये खर्चून केलेली ठिबक सिंचन व्यवस्था आणि पाइपलाइनचाही पूर्णतः कोळसा झाला आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

शेतकऱ्याने आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जपलेल्या या झाडांचे झालेले नुकसान पाहून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक वणवा लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे. या घटनेची माहिती तहसीलदार, गावकामगार तलाठी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली असून, नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

“मी खूप कष्टाने ही बाग उभी केली आहे. यात आंबा, फणस, नारळ, चिकू अशी झाडे लावली होती. अज्ञात व्यक्तीने वणवा लावल्याने उभी बाग अचानक नाहीशी झाली. शासनाने तत्काळ याचा पंचनामा करून मला झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.”प्रभाकर सूर्यवंशी, नुकसानग्रस्त शेतकरी, मारूल तर्फ पाटण.


Back to top button
Don`t copy text!