
सुदानमध्ये वीरमरण आलेले फलटणचे सुपुत्र नायक विकास गावडे यांचे पार्थिव आज सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. शासकीय सोपस्कारानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत पार्थिव मूळगावी बरड येथे पोहोचणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.
स्थैर्य, फलटण, दि. 12 जानेवारी : सुदान येथील संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेवर असताना वीरमरण आलेले फलटण तालुक्यातील बरड गावचे सुपुत्र, नायक विकास विठ्ठलराव गावडे यांचे पार्थिव आज (सोमवारी) सकाळी मायदेशी अर्थात मुंबईत दाखल झाले आहे. ‘वीरपुत्र परतला’ ही बातमी समजताच बरड गावासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, आपल्या लाडक्या सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारो डोळे आस लावून बसले आहेत.
मुंबईत पार्थिव दाखल, दुपारी ४ वाजता बरडमध्ये येणार
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहीद विकास गावडे यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान आज सकाळी ०७:१५ वाजता मुंबई विमानतळावर लँड झाले आहे. विमानतळावर दाखल झाल्यानंतर कस्टम क्लिअरन्स (Custom clearance) आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी साधारण ३ तास लागणार आहेत. त्यानंतर मुंबईतच लष्कराच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून (Wreath Laying) आदरांजली वाहिली जाईल, ज्यासाठी साधारण १ तासाचा अवधी लागेल. हे सर्व शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने रस्तेमार्गाने पुण्यामार्गे फलटणकडे रवाना होईल. आज दुपारी ४:०० (16:00 hrs) वाजेपर्यंत शहीद विकास गावडे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, बरड (ता. फलटण) येथे पोहोचणे अपेक्षित आहे.
प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा
याबाबतची माहिती फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी सातत्याने संपर्क असून, प्रशासकीय यंत्रणा अंत्यसंस्कारासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
बरड येथे पार्थिव दाखल झाल्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या मातीतील वीराचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
