स्थैर्य, सोनवडी, दि.२: परळी खोर्यातील काळोशी (ता. सातारा) येथील सूरज लक्ष्मण लामजे (वय 28) या जवानाचा लडाख (जम्मू काश्मीर) येथे हे अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. सूरज यांचे पार्थिव रविवारी रात्री उशिरा सातारा जिल्ह्यात आणण्यात आले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मिरवणूकीनंतर त्यांचे बंधू राजेश यांनी भडाग्नी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हुतात्मा सूरज लामजे यांच्या घरातच सैनिकी वारसा आधीपासूनच होता. त्यातूनच आपणही देशाचे काही तरी देणे लागतो. या भावनेतून ते सैन्यात भरती झाले. कुरुन गावचे सुपुत्र सूरज लामजे हे 2014 मध्ये मुंबई लष्करात भरती झाले होते. त्यानंतर बंगळूर येथे त्यांचे प्रशिक्षण झाले. सध्या ते लडाख येथे कर्तव्य बजावत होते. सूरज हे चालक असल्याने शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सैन्यदलातील साहित्य घेऊन जात असताना त्यांचे वाहन दरीत कोसळले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लामजे यांचे पार्थिव रविवारी रात्री उशीरा सातार्यात दाखल झाले तरीही आपल्या मित्राला, भावाला अन् योद्ध्याला मानवंदना देण्यासाठी संपुर्ण परळी खोर्यासह जिल्ह्यातून मोठी गर्दी झाली होती. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, पोलिस निरिक्षक सजन हंकारे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होवू नये यासाठी पोलीसांचा प्रयत्न सुरू होता. तथापि, शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरीक आले होते. सुरज लामजे अमर रहे च्या घोषणांनी संपुर्ण काळोशी गाव दणाणून गेले होते. मिरवणुकीनंतर हुतात्मा सुरज लामजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यनिष्ठ जिल्ह्याचे सुपुत्र हरवल्याने काळोशी गावासह संपूर्ण जिह्यात शोककळा पसरली आहे. हुतात्मा सूरज लामजे यांच्या पश्चात एक भाऊ, बहीण आई-वडील, आजी, पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे.
मुलाचे तोंड पहाण्याआधी आले विरमरण
हुतात्मा लामजे यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. लामजे यांचे पार्थिव जसे बोगद्यातून बाहेर आपल्या गावाकडे निघू लागले. तेव्हा डबेवाडी, माणेवाडी, भोंदावडे या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावरून हुतात्मा सूरज लामजे अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण भाग दणाणून सोडला होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. लामजे यांच्या 3 महिन्यांच्या मुलाकडे पाहताना अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. संपूर्ण परिसर लामजे यांच्या जाण्याने शोकसागरात होता.