
दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । जावळी । जावळी तालुका चे सुपुत्र- शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फ कुडाळ येथे आज सकाळी साश्रूपूर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी जावळी तालुक्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले वसंतराव मानकुमरे दीपक पवार, जावळी तहसीलदार राजेंद्र पोळ, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शितल जानवे खराडे, जावळी तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, गटविकास अधिकारी काळेल, विलास बाबा जवळ, जयदीप शिंदे आदी मान्यवर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
“अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे” च्या जयघोषाने प्रथमेश पवार यांचे पार्थिव गावात आल्यावर संपूर्ण गाव गहिवरून गेला. दोन दिवसापूर्वीच जवान प्रथमेश पवार यांना वीरमरण प्राप्त झाला असल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना दूरध्वनीवरून जम्मू वरून मिळाल्यानंतर ही बातमी पूर्णता वाऱ्यासारखी जावळी तालुक्यात जिल्ह्यात पसरली. जावळी तालुक्यात मधील बामनोली तार्फ कुडाळ परिसरावर पूर्णतः शोककळा पसरली. दोन दिवसापासून शहीद जवान प्रथमेश पवार यांच्या पार्थिवाचे प्रतीक्षा संपूर्ण जावळी तालुका लागली होती. अखेर आज सकाळी सातच्या सुमारास पाचवड येथील महामार्गावर शहीद जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव दाखल झाले. त्यानंतर महामार्गापासून सरताळे ते कुडाळ सोमर्डी या मार्गावरून शहीद जवान प्रथमेश पवार यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या एका रथावर ठेवून हजारो युवकांच्या उपस्थितीमध्ये पार्थिव त्यांच्या मुळगाव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणण्यात आले.
शहीद जवान प्रथमेश पवार यांचा पार्थिव गावात दाखल होताच गावातील महिला व त्यांच्या बरोबर बालपणापासून राहिले त्यांचे सर्व मित्र समूहाने एकच हंबरडा फोडला. पूर्ण गावात त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आल्यानंतर पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले. याच वेळी उपस्थित शहीद प्रथमेश पवार यांची वीर माता यांनी पार्थिवाला पाहताच जोरदार हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शहीद जवान प्रथमेश पवार यांचे वडील, लहान बंधू व कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी आक्रोश व्यक्त करत शहीद जवानाच्या आदरांजली वाहिली.
कुडाळ येथून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. प्रथमेश यांच्या घरी डेरेवाडी येथे घरासमोर पार्थिव आणल्यानंतर प्रथमेश यांच्या आई राजश्री पवार यांनी हंबरडा फोडला अन् उपस्थित हेलावून गेले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. “अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे” च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. संपूर्ण परिसर साश्रूनयनांनी गलबलून गेला. सकाळी 10 वाजता प्रथमेश यांच्या पार्थिवाला पवार यांचे छोटे बंधू आदित्य पवार याने मुखाग्नी दिला. त्यावेळी बामणोली ग्रामस्थांनी नियोजनबद्ध सर्व अंत्यविधीची तयारी केल्यामुळे पार्किंग व्यवस्था तसेच इतर अंत्यविधीला उपस्थित राहणारे व आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणारे जावली तालुक्यातील हजारो नागरिकांची कुठेही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली.