दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न समिती शेतकऱ्यांसाठी विविध योजना ह्या कायमच राबवित असेत. फलटण कृषी उत्पन्न समितीने राबवलेला योजनांचा “फलटण पॅटर्न” हा राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी आदर्शवत असून आगामी काळामध्ये बाजार समितीचा “फलटण पॅटर्न” हा संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक कमावेल असा विश्वास महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संपुर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेल्या नवभारत वृत्तपत्र समूहाच्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र समुहाच्या वतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात मध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला उत्कृष्ट बाजार समिती हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, सचिव शंकर सोनवलकर, संचालक प्रकाश भोंगळे, संजय कदम, परशुराम फरांदे, चांगदेव खरात व दैनिक नवराष्ट्रचे फलटण तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांच्यासह फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याला एक वैभवशाली अशी परंपरा आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचे बीज हे रूजलेले आहे. संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सहकार चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. सहकार चळवळीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या संस्थाही कार्यरत आहेत. सहकार चळवळ म्हणजे महाराष्ट्र राज्याचा एक भागच झालेला असून राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बघितलेले महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सहकार चळवळ ही कारणीभूत आहे. आगामी काळामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेल्या मार्गावर सर्वजण कार्यरत राहू, असेही महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रामध्ये 1965 सालापासून सहकार चळवळीला मोठे स्वरुप प्राप्त झाले. सहकारी साखर कारखाने, सहकारी दुग्ध विकास संस्था, सहकारी औद्योगिक संस्था, सहकारी कृषी औद्योगिक संस्था अशा विविध प्रकारच्या संस्था महाराष्ट्र मध्ये सुरू झाल्याने महाराष्ट्र हा सहकाराचा एक भागच झाला व सहकार हा महाराष्ट्राचा एक भाग झाला. या सर्वा बरोबरच अर्थकारण व्यवस्थित राहण्यासाठी सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका या सुद्धा महाराष्ट्र राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागांमध्ये कार्यरत असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी कार्यरत राहण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या उन्नती मध्ये सहकार चळवळीचा मोठा वाटा असल्याचेही महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सहकारी, औद्योगिक कृषी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.