दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । फलटण । राष्ट्रीयकृषि विकास योजनेतून फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत उभारण्यात आलेल्या धान्य ग्रेडिंग युनिटद्वारे शेतमालाची अल्पदरात व योग्य वेळेत स्वच्छता होणार आहे. यातून शेतमालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार असल्याने हा प्रोजेक्ट शेतकर्यांसाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
शेतमालाची स्वच्छता करुन त्याची प्रतवारी सुधारण्यासाठी तसेच शेतकर्यांचा पैसा व वेळ वाचवण्यासाठी धान्य ग्रेडिंग युनिटची उभारणी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती देताना श्रीमंत रघुनाथराजे यानी सांगितले की, शेतकर्यांच्या हितासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून बसविणेत आलेल्या धान्य चाळणी यंत्रणा (ग्रेडिंग युनिट) च्या माध्यमातून शेतकर्यांची खुप मोठी सोय तसेच मदत, मार्केट यार्ड फलटण येथे होणार आहे. शेतात तयार झालेल्या धान्यामध्ये काही प्रमाणात किंवा कधी जास्त प्रमाणात माती, छोटे खडे, पाला-पाचोळा अशा काही खराब गोष्टी आढळून येतात. त्या हाताने किंवा कामगार लावून स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पैसेही जास्त लागतात. तसेच खाजगी ग्रेडिंग युनिटमध्ये ही धान्याच्या स्वच्छतेसाठी जादा दराची आकारणी केली जाते. शिवाय या प्रक्रियेमध्ये शेतकर्याला धान्य स्वच्छ करण्यासाठी ग्रेडिंग युनिट पर्यंत धान्य वाहतूक करून घेऊन जावे लागते. नंतर धान्य स्वच्छ करून झाल्यावर ते मार्केट यार्डमध्ये आणावे लागते. यामध्ये शेतकर्याचा वाहतूक खर्च, मजूरी वाढते. शेतकर्याचे हे नूकसान टाळण्यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रेडिंग युनिट ची स्थापना करण्याचे आम्ही ठरवले व आता हा प्रकल्प पूर्णपणे उभा केला आहे.
आता शेतकर्यांना अन्यत्र कोठेही न जाता कमी खर्चात, कमी वेळात थेट बाजार समितीत धान्य स्वच्छ करुन मिळणार असल्याने वेळ व खर्च वाचून शेतमालाला चांगला भाव मिळण्यासही मदत होणार आहे, असा विश्वासही श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.