
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळेधारकांनी गेल्या १३ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण आज मागे घेण्यात आले आहे. बाजार समितीने केलेली अवाजवी आणि बेकायदेशीर भाडेवाढ तसेच जीएसटी लागू करण्याच्या विरोधात हे गाळेधारक तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. आज ३८ व्या दिवशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी मध्यस्थी करत गाळेधारकांशी चर्चा केली आणि त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
बाजार समितीच्या प्रशासनाने पोटनियमांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता गाळ्यांच्या भाड्यात दुप्पट वाढ केली होती. याविरोधात गाळेधारकांनी तीव्र संताप व्यक्त करत १३ ऑक्टोबर २०२५ पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासनाने म्हणावी तशी दखल घेतली नव्हती.
आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी गाळेधारकांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, सहाय्यक निबंधक (एआर) कार्यालयाच्या प्रतिनिधींनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.
भाडेवाढ आणि जीएसटीच्या मुद्द्यावर गाळेधारकांना दिलासा देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिल्यानंतर, गाळेधारकांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आम्ही ३८ दिवस उपोषण केले, आम्हाला कोणीही विचारायला आले नव्हते. आज दादा, आमदार साहेब आणि शिवरूपराजेंनी येऊन एआर ऑफिसच्या अधिकाऱ्यासमक्ष आम्हाला शब्द दिला आहे. भाडेवाढ आणि जीएसटीमध्ये लक्ष घालू, असे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आम्ही आज हे उपोषण सोडत आहोत”.
यावेळी गाळेधारकांनी मान्यवरांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले. या मध्यस्थीमुळे बाजार समिती आणि व्यापारी यांच्यातील तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली असून, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

