
मर्ढे- बा.सी.मर्ढेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना डॉ. राजेंद्र माने. त्यावेळी नंदकुमार सावंत व इतर.
स्थैर्य, 21 मार्च, सातारा : मर्ढे गाव हे सध्या साहित्य तीर्थ झाले आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर साहित्यिक आवर्जून या गावाला भेट देतात. मसाप शाहूपुरी शाखेने निर्माण केलेले हे मर्ढेकरांच्या कवितेचे उत्तम स्मारक आहे. मर्ढेकर हे युगप्रवर्तक कवी होते. आशय आणि वास्तवता या दोन्हीचा संगम त्यांच्या कवितेमध्ये होता. वेगळ्या प्रतिमा आणि रूपकं त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांनी कवितेला एक नवीन वाट निर्माण करून दिली, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा शाहूपुरी सातारा मार्फत मर्ढे येथे कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने बोलत होते. यावेळी मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, अमर बेंद्रे, सचिन सावंत, मर्ढे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, सतीश घोरपडे, मोरेश्वर जोशी, राजेंद्र जगताप, अरविंद मोरे, मर्ढेकरांचे रसिक वाचक गणपतराव धावडे, वास्तूची देखभाल करणार्या हिराबाई निकम व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी कवी बा.सी.मर्ढेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. राजेंद्र माने म्हणाले, बा.सी. मर्ढेकर यांनी कवितेसोबत कादंबरी आणि समीक्षा दोन्हीही लिहिले. समीक्षकांनाही कवितेच्या समीक्षेला वेगळा विचार करण्यात भाग पाडले. इंग्रजीचे प्राध्यापक ते आकाशवाणी केंद्रावर नोकरी असा प्रवास त्यांनी केला. शेवटचा काळ मर्ढे गावात घालवावा अशी त्यांची इच्छा होती. नदीचा काठ, घाट या सर्वांचा संदर्भ त्यांच्या कवितेमध्ये येतो.मराठी कवितेत मर्ढेकरांच्या कवितेला वेगळं स्थान आहे. प्रास्ताविक नंदकुमार सावंत यांनी केले, त्यात त्यांनी शाहूपुरी शाखेने मर्ढेकरांच्या घरात उभा केलेल्या त्यांच्या कवितारूपी स्मृतींची माहिती दिली. सूत्रसंचालन अमर बेंद्रे यांनी तर उपस्थितांचे आभार सचिन सावंत यांनी मानले

