दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । सातारा । जागतिक ग्राहक दिनानिमित्त 15 १५ मार्च 2022 रोजी ग्राहकांना असणारे हक्क, हित व ग्राहकांचा अधिकार, वैधमापनशास्त्र कायदा 2009, वैधमापनशास्त्र अंमलबजावणी नियम 2011 याबाबत जनजागृती करण्यात येणार असून ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेज, सातारा येथे सकाळी 11.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक ज्यो.सं. पाटील यांनी दिली आहे.
वैधमापनशास्त्र विभागाकडून व्यापारी, इंडस्ट्रीजमध्ये वापरण्यात येणारी वजने, मापे काटे व व्यवहारात वापरात येणारी मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक काटे हे विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करुन घेणे आवश्यक आहे. (मेकॅनिकल 2 वर्षांनी व इलेक्ट्रीक दर वर्षी) तसेच ते विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करुन न घेतल्यास व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होवू नये, ग्राहकांना कमी माल मिळू नये याकरिता कायदा नियमांमध्ये दंडात्मक कार्यवाहीची तरतुद आहे.
ग्राहकांना त्यांनी अदा केलेल्या किंमतीच्या दृष्टीने योग्य मोबदला मिळणे अपेक्षित असून ग्राहकांचे हित जोपासणे हे वैधमापनशास्त्र विभागाचे उद्दिष्ट आहे. 15 मार्च 2022 रोजी जागतिक ग्राहक दिन वैधमापनशास्त्र विभागाकडून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांची जनजागृती करण्यात येणार आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक ज्यो.सं. पाटील यांनी केले आहे.