मॅरेथॉनमुळे मुंबईची दातृत्व संस्कृती अधोरेखित – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । मुंबई । मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच दानशूर लोकांचे शहर देखील आहे.  मुंबई मॅरेथॉनच्या  माध्यमातून देशभरातील विविध सामाजिक उपक्रमांकरिता मोठ्या प्रमाणात निधी जमा झाल्यामुळे मुंबईची दातृत्व संस्कृती पुनश्च अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी अधिकाधिक निधी संकलन करणाऱ्या अशासकीय व सेवाभावी संस्था तसेच वैयक्तिक निधी संकलकांचा ‘टाटा मुंबई मॅरेथॉन फिलांथ्रोपी नाईट अवॉर्ड्स २०२३’ या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पुरस्कार सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, टाटा सन्सचे ब्रँड कस्टोडिअन हरीश भट्ट, प्रोकॅम इंटरनॅशनलचे अनिल सिंह आणि विवेक सिंह,  युनायटेड वे मुंबईचे मुख्याधिकारी जॉर्ज आईकरा व इतर निमंत्रित उपस्थित होते.

केवळ २० वर्षांमध्ये मुंबई मॅरेथॉन देशातली सर्वात लोकप्रिय मॅरेथॉन झाली असून यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ५५ हजार स्पर्धकांनी भाग घेणे ही स्पर्धेच्या लोकप्रियतेची पावती आहे, असे सांगताना मुंबई मॅरेथॉनमुळे भारताचे नाव जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर आले आहे, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले. मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाला उत्तम धावपटू, खेळाडू मिळतील आणि ते देशाचे नाव मोठे करतील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

मॅरेथॉनच्या माध्यमातून यंदा आरोग्य, शिक्षण, प्राणी कल्याण, पर्यावरण, महिला सबलीकरण आदी क्षेत्रातील सामाजिक कार्यासाठी ४०.६८ कोटी रुपये जमा झाले. तसेच या मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीपासून आजवर ३५७ कोटी रुपये जमा झाले, याबद्दल आनंद व्यक्त करताना निधीच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील अज्ञात दिव्यांग, अपंग, निराधार व इतर गरीब, गरजू लोकांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत तेवेल असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते सेवाभावी संघटनेसाठी अधिकाधिक निधी संकलित केल्याबद्दल श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर, ‘युनायटेड वे मुंबई’ व सेंट्रल चिन्मय मिशन ट्रस्ट या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.  याशिवाय वैयक्तिक निधी संकलनाकरिता श्याम जसानी, मनीषा खेमलानी, सदाशिव राव व नव्या आणि गगन बंगा यांना ‘चेंज लेजंड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावर्षी २५२ सेवाभावी संस्था, १७७ कॉर्पोरेट्स, १००० वैयक्तिक निधी संकलक, १७ हजार दानशूर व्यक्ती यांसह १० हजार स्पर्धकांनी विविध समाजकार्यांकरिता निधी संकलित केला.


Back to top button
Don`t copy text!