
स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : सातारा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि धन्वंतरी पतसंस्था यांच्या वतीने कर्करोगाविषयी जनजागृती व धन्वंतरी पतसंस्था जीपीथॉन 2026 मॅरेथॉन स्पर्धेचे एक फेब्रुवारीला आयोजन केल्याची माहिती धन्वंतरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोसले व जीपीथॉन 2026 मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. भोसले म्हणाले, कर्करोगाविषयी समाजात शास्त्रोक्त माहितीपेक्षा गैरसमज व भीतीचे वातावरण अधिक आहे. या आजाराविषयी नागरिकांमध्ये शास्त्रोक्त माहिती देऊन आजाराची भीती व गैरसमजकमी करण्यासाठी एक फेब्रुवारीला जीपीथॉन 2026 मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. 24 जानेवारीला धन्वंतरी पतसंस्था सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत महिलांची गर्भाशयाची पॅपस्मिअर चाचणी व स्तनाची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. ही तपासणी 30 ते 65 वयोगटातील महिलांची तज्ज्ञांची माध्यमातून करण्यात येईल. इच्छुकांनी (8856039040) येथे व्हॉट्सअॅप माध्यमातून नोंदणी करावी.
रन फॉर कॅन्सर अवेअरनेस यासाठी एक फेब्रुवारीला धन्वंतरी पतसंस्था जीपीथॉन 2026 या पाच आणि दहा किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यातआल्याची माहिती स्पर्धेचे अध्यक्ष डॉ. नितीन लेंभे व रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे यांनी दिली. या मॅरेथॉनमध्ये सातार्यासह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि बारामती आदी भागांतील धावपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी डॉ. रवींद्र भोसले, डॉ. कांत फडतरे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. सुधीर पवार, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. जवाहर शहा, डॉ. अभय टोणपे, डॉ. राजेंद्र सकुंडे, डॉ. किशोर शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेसाठी) 25 जानेवारीपर्यंत www.gpsatara. com या संकेतस्थळावर नोंदवावी, असे आवाहन डॉ. लेंभे यांनी केले.

