फलटणला आजपासून मराठी जैन साहित्य संमेलन

साहित्य परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे दोन दिवस आयोजन


स्थैर्य, फलटण, दि. 25 डिसेंबर : महास्वामी श्री लक्ष्मी सेन महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जैन मठ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्यावतीने गुरुवार दि. 25 व शुक्रवार दि. 26 डिसेंबररोजी फलटण येथे दोन दिवसीय 27 वे मराठी जैन साहित्य संमेलन होणार आहे.

जैन धर्मीयांची दक्षिण काशी असलेल्या फलटणनगरीत गुरुवारी (दि. 25) पहिल्या सत्रात संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिक विजय आवटी भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अभ्यासक डॉ. प्रा. श्रीमंत कोकाटे असणार आहेत. स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी असणार आहेत. यावेळी मंगल सानिध्य प.पू. 108 आचार्य श्री पद्मनंदी जी महाराज सत्संग प.पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मी सेन महाराज (कोल्हापूर), प.पू. स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य जिनसेन महाराज (नांदणी) यांची विशेष उपस्थिती आहे.

दुसर्‍या सत्रामध्ये ’जैन साहित्य संस्कृतीस फलटणचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. सुधीर शास्त्री (बारामती) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. महावीर शास्त्री व प्रा. डी. ए. पाटील हे सहभागी होतील. तिसर्‍या सत्रात ’भारतीय चित्रपट सृष्टीला जैनांचे योगदान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यावेळी पुरंदर चौगुले अध्यक्षस्थानी आहेत. यामध्ये डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व अनमोल कोठाडिया (कोल्हापूर) हे सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये ’जैन पत्रकारिता दशा व दिशा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. गजकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. ए. ए. मासुर्ले, डॉ. नेमिनाथ शास्त्री हे सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात विजयकुमार बेळके यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन होणार आहे. त्यावेळी दुसर्‍या सभागृहात बालकुमार साहित्य संमेलन होणार आहे.

शुक्रवारी (दि. 26) ’आजची जैन स्त्री’ या परिसंवादात प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली नेहा शहा, संगीता शहा व शुक्ला गांधी हे सहभागी होणार आहेत. सहाव्या सत्रामध्ये ’प्राचीन जैन साहित्य एक चर्चा प्राचीन, अर्वाचीन, प्रागतिक विचार’ या परिसंवादात जैन इतिहासाचे अभ्यासक संजय देवगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. महावीर शास्त्री व प्रा. रमेश मडकर हे जैन अभ्यासक सहभागी होणार आहेत. त्यानंतर कथाकथन होईल.समारोप सत्रात महास्वामी लक्ष्मीसेन महाराज यांचे सानिध्य लाभेल. त्यामध्ये प्रमुख पाहुणे प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे ’युवक युती मूल्यवर्धन व ’उद्योग व्यवसाय’ या विषयावर विचार मांडतील.

संमेलनासाठी स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, गौरवाध्यक्ष किशोर शहा, अध्यक्ष मंगल दोशी, नितीन गांधी, दीपक दोशी, आलोक दोशी, राजकुमार दोशी, विश्वस्त राजेश शहा, धनंजय शहा, अनिल शहा, विनय गांधी, बीना शहा, डॉ. रवींद्र दोशी, सुकुमार चंकेश्वरा हे उपस्थित राहतील.

व्यासपीठ उद्घाटन किशोर शहा (चंदुकाका सराफ, बारामती) यांच्या हस्ते होईल. भूषण दोशी यांच्या हस्ते जिनवाणी शास्त्र पूजन, ध्वजारोहण शैला गांधी, तर भव्य ग्रंथदिंडी प्रारंभ जयश्री दोशी यांच्या हस्ते होईल. प्राचीन दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रफुल्लता गांधी यांच्या हस्ते होईल.

यावेळी राजकुमार व्होरा, चंद्रशेखर दोशी, वीरकुमार दोशी यांची उपस्थिती राहील. व्यासपीठ उद्घाटन किशोर शहा त्यांच्या हस्ते होईल. फलटण पंचक्रोशीसह सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतील साहित्यिक, लेखक, कवी यांनी या संमेलनाचा लाभघ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी यांनी केले आहे.महास्वामी लक्ष्मीसेन अध्यक्ष प्रा. डी. ए. पाटील, सचिव संजय देवगोंडा-पाटील व सुरेश रोटे यांनी माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!