दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । मुंबई । मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी अर्ज केल्यानंतर तीन महिन्यातच नियमानुसार अनुदान अदा करण्यात येईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना अधिकचे अनुदान आणि प्रेरणादायी (थीमबेस) चित्रपटांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान देण्यात येईल. यासाठी मराठी चित्रपट अनुदान समिती पुनर्गठित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
मराठी चित्रपट अनुदान समिती पुनर्गठित करून चित्रपटांना अनुदान अदा करण्याबाबत सदस्य विलास पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मराठी चित्रपटांना प्रोत्साहन आणि अर्थसाहाय्य मिळावे यासाठी निर्मिती नंतर दोन वर्षाच्या आत अर्ज केलेल्या चित्रपटांना तीन महिन्यात नियमानुसार अनुदान अदा करण्यात येईल. चित्रपटगृहात जाणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मसारखे माध्यम विकसित होत आहे. या संदर्भात समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून नवीन चित्रपटगृहे बांधावित किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापर करावा किंवा नाट्यगृहाचे नाट्यचित्रगृहामध्ये रूपांतर करावे, याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सचिन अहिर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.