दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । मुंबई । मराठी विश्वकोशाने दर्जेदार व विश्वासार्ह नोंदीच्या माध्यमातून मराठी भाषेच्या अभिजाततेसाठी मूलभूत पायाभरणी केली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विश्वकोश कार्यालयात आयोजित अभिजात मराठी भाषा व मराठी विश्वकोश या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विश्वकोशाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, किसनवीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, वाई शहरातील कन्याशाळा, भारत विद्यालय, जॉय चिल्ड्रन ॲकॅडेमी, गर्ल्स हायस्कूल, रमेश गरवारे स्कूल, नॅशनल पब्लिक स्कूल, द्रविड हायस्कूल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, सेंट थॉमस स्कूल, ब्लॉसम चिल्ड्रन ॲकॅडमी, दिशा पब्लिक स्कूल आदी शाळांतील मराठी विषय शिक्षक उपस्थित होते.
मराठी विश्वकोश मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून दर्जा मिळवून देण्यात कायमच अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे जगभरातील मराठी वाचक विश्वकोशाकडे विश्वासार्ह माहितीचा स्त्रोत म्हणून पाहत आहे. मराठी विश्वकोशाच्या अद्ययावत संकेतस्थळावर कोट्यवधी वाचकांनी दिलेली भेट ही याची पोच पावती आहे. मराठी विश्वकोशाचे हे काम सातत्यपूर्ण असून शिक्षकांनी या विश्वकोशाशी मैत्री करुन अद्ययावत ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन डॉ. दीक्षित यांनी केले.
याबरोबरच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने विश्वकोशाच्या विविध विद्यापीठीतील 45 ज्ञानमंडळांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, तसेच लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांचे अभिजात भाषा आणि लोक या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. राजेंद्र मगर, डॉ. सूर्यकांत गायकवाड यांचे व्याख्यान तसेच ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कविसंमेलन घेण्यात आले. तसेच विश्वकोषाच्या 45 ज्ञानमंडळांच्या वतीने शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे या विषयावरील चित्रफित दाखवून मराठी भाषेच्या अभिजाततेबद्दल जागर करण्यात आला.