
दैनिक स्थैर्य । दि. २५ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रारंभी बी.ए.भाग १ मधील विद्यार्थिनी प्रज्ञा मोहिते हिच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. तसेच मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता पत्रकांचे प्रकाशन केले. या वेळी मराठी विभागातील प्रा.डॉ.कांचन नलावडे, डॉ.विद्या नावडकर डॉ. संजयकुमार सरगडे व प्रा.प्रियांका कुंभार हे उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना अनेकांनी बहिणाबाई यांच्या कवितेबद्दल मते व्यक्त केली. डॉ.कांचन नलावडे म्हणाल्या की बहिणाबाई यांच्या वाट्याला परिस्थितीने दुःख दिलेले असले तरी अतिशय सकारात्मक गाणी त्यांनी रचलेली आहेत स्वतः अशिक्षित होत्या. त्यांना तीन मुले होती. अशिक्षित असल्यातरी त्या सुशिक्षित होत्या.प्रतिभा शक्तीची देणगी त्यांना होती. बहिणाबाई यांच्या कविता सोपानदेव यांच्यामुळे उजेडात आल्या .सोन्याच्या मोहराचा हंडा महाराष्ट्राला मिळाला. त्यांची कविता पोटातून आली ईश्वर .स्त्री ,शेतकरी ,मन ,संसार,अशा विविध विषयावर त्यांनी चिंतनाने गाणी रचलेली आहेत.मराठी साहित्यात बहिणाबाई चौधरी यांचे स्थान अढळ आहे. प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे म्हणाले, त्यांनी आयुष्यत जे जगले भोगले ते त्यांच्या कवितेत आले.त्यांच्या कविता ही तुमच्या आमच्या जीवनाची वाटते. तुकोबांचे अभंग जसे आपल्या ओठावर आहेत तसेच त्यांची गाणी रुळलेली आहेत.त्यांची कविता समाजात नैतिकता शिकवणारी आहे. डॉ.विद्या नावडकर म्हणाल्या की माणूस म्हणून जगण्यासाठी बहिणाबाई कविता मार्गदर्शन करते. मराठी विभाग प्रमुख डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की ‘’ जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं पृथ्वीच्या रे मोलाचं’ ही बहिणाबाई यांच्या कवितेतील आशावादी जीवनदृष्टी आपली हिम्मत वाढवते आणि अधिक चांगले जगण्याची प्रेरणा देते. संसार रडत कुढत माणसाने जगू नये ,रोज काम प्रामाणिक पणाने जगावे, जीवन मिळाले या बद्दल कृतज्ञत व्यक्त करावी ही त्यांची विचार सरणी होती.कल्पक बहिणाबाई ‘माहेरच्या वाटेवर जाताना देखील निसर्गातील विविध रूपे त्या उभ्या करतात त्यांच्या गाण्याच्या प्रत्येक कडव्यात सौंदर्य आणि जीवनाचे शाश्वत तत्वज्ञान आपल्याला दिसते .गावातल्या चांगल्या वाईट प्रवृत्ती दाखवून माणसाने चांगलेच राहिले पाहिजे असा त्यांचा नैतिक आग्रह आहे. कुत्रे देखील इमानदारीने राहते ,पण आपली म्हणणारी माणसे विश्वासघात कधी करतील हे सांगता येत नाही.म्हणून अरे माणसा माणसा कधी होशील माणूस ? ही त्यांची हाक ही जणू जगाला चांगले वागण्यासाठी केलेले आवाहनच आहे असे मला वाटते.’ डॉ.सुभाष वाघमारे यांनी संसार आणि मन ही गाणी त्यांनी गाऊन दाखवली. प्रज्ञा मोहिते हिने बहिणाबाई यांच्या कवितेमुळे आम्हाला बोलण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.