ओबीसी आरक्षणाला धक्का न देता मराठा आरक्षण द्यावे!


 

स्थैर्य, मुंबई, दि.२८: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील आणि ओबीसी नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांना निवेदन दिलं.

महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्यावतीने या निवेदनाद्वारे आपले लक्ष वेधण्यात येते की, सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय आणि सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश या भागांमध्ये कुणबी समाजाची संख्या सुमारे ३५ टक्के आहे. हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे. निसर्गाचा कोप आणि शासनाचे चुकीचे धोरण, अपुरे शिक्षण यामुळे स्वातंत्र्यानंतरही हा समाज अतिशय मागासलेपणाचे जीवन जगत आहे. नोक-यांच्या अभाव आणि तुटपुंजी शेती यामुळे हा समाज कर्जबाजारी झाला आहे.

ओबीसी वर्गात मोडत असलेला बारा बलुतेदार वर्गही हलाखीचे जीवन जगत आहे. ओबीसी वर्गात सुमारे ३५० जातींचा समावेश करण्यात आला असल्याने कुणबी समाजाला सामाजिक न्यायापासून वंचित केले जात आहे

वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे बारा बलुतेदार वर्गात मोडणा-या सर्व जातींमध्येही असंतोषाची भावना आहे. असं असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसी वर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होईल. आम्ही नम्रपणे आपणास या निवेदनाद्वारे सूचित करीत आहोत, महाराष्ट्रात जातीनुसार लोकसंख्या शासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला नव्याने दिलेले आरक्षण चुकीचे आहे, असे आमचे ठाम मत आहे.

महाराष्ट्रात आपण ओबीसी वर्गासाठी घेतलेली सामाजिक न्यायाची भूमिका दिलासादायक आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा आमचा विरोध नाही. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देऊ नये, ही आमची नम्र विनंती आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!