
स्थैर्य, फलटण, दि. ०१ ऑक्टोबर : “एक हात मदतीचा, माणुसकी जपण्याचा,” या उक्तीप्रमाणे, मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी फलटण तालुक्यातील दानशूर व्यक्ती आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सढळ हाताने मदत जमा करण्यात आली. धान्य, किराणा किट, कपडे, औषधे आणि इतर जीवनावश्यक साहित्याने भरलेले दोन ट्रक आज, मंगळवारी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा, फलटणच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तालुक्यातील मराठा समाजासह सर्व जाती-धर्मांतील नागरिकांनी या मदत कार्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये धान्य, किराणा किट, कांदे-बटाटे, भाजीपाला, नवीन साड्या, लहान मुलांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, औषधे, सॅनिटरी पॅड, पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, चादरी आणि भांडी अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता.
आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते मदतवाहनांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही ट्रक धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका आणि जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याकडे रवाना झाले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत, विक्रमसिंह शितोळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. जमा झालेल्या मदतीचे योग्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची एक निरीक्षक टीमही या वाहनांसोबत गेली आहे, ज्यात माऊली सावंत, विक्रमसिंह शितोळे, किरण भोसले, नरेश सस्ते, रामभाऊ सपकाळ आणि अक्षय तावरे यांचा समावेश आहे.