
स्थैर्य, फलटण, दि. ०८ ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठीची ही शेवटची आणि अस्तित्वाची लढाई असून, समाजाने राजकारण बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुंबईत एकत्र यावे, असे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केले. फलटण येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्र बैठकीत पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे, पण सरकारने त्याचा गैरफायदा घेऊ नये. राज्यात जर ओबीसी-मराठा दंगल झाली, तर त्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सत्ताधारी पक्षातील मराठा नेत्यांनीही समाजासाठी उभे राहावे, असे आवाहन करत, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.