दैनिक स्थैर्य | दि. 19 डिसेंबर 2023 | फलटण | महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलने केली जात आहेत. आता असणाऱ्या कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. यासोबतच राज्यामध्ये असणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा मोठा आहे. त्यांच्या मागणीनुसार त्यांचेही आरक्षण बदलून द्यावे; अशी आग्रही मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली; त्यावर येणाऱ्या काळामध्ये या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळावे; यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली होती. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्रातील आरक्षण परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भुमिका यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.
महाराष्ट्रातील मराठा समाजाने देशासाठी बलिदान दिले आहे. सर्व समाजातील समाज घटकांना बरोबर घेऊन जाणार म्हणून ओळखला जाणारा हा समाज आहे. परंतु आता समाजातील मुला मुलींची व कुटुंबाची अर्थिक परिस्थिती भयावह झाली आहे. समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी फी भरणे अवघड आहे. पालकांना जमीन विकुन, बँक व खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. तर शिक्षण झाल्यानंतर नोकरीची शाश्वती नाही; त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांनी केली.
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे; यासाठी हा समाज आनेक वर्ष झटत आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळाले आहे. परंतु महाराष्ट्रात शब्दांचा खेळ झाला आहे. महाराष्ट्रत धनगड शब्द नसल्याने आरक्षण मिळत नाही. तरी याबाबत आपण लक्ष घालावे व समाजाला आरक्षण द्यावे; अशी विनंती यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले केली.