स्थैर्य, सातारा, दि. २४ : कोरोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले असल्याने नियमांची अपरिहार्यता पाळूनही शहरातील बहुतांशी सर्वच मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र तोच आहे.
यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणात निर्बंध पोलिसांच्यावतीने लावण्यात आले आहेत. मंडपाच्या आकारापासून ते अगदी लाऊडस्पीकर, मंडपातील कार्यकर्त्यांची संख्या, करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम, मूर्तीची उंची, सॅनिटायझरिंग यावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ज्या मंडळांच्या गणपतीचे मंदिर आहे अशा मंडळांनी आपले गणपती त्या मंदिरात बसवले आहेत. चार फूट उंचीची मर्यादा असल्याने अनेकांनी हा नियम अगदी काटकोरपणे पाळत आपल्या पारंपरिक गणरायाच्या चार फूट आकाराची मूर्ती प्रशासनाने मंडपाच्या बाबतीत घातलेल्या नियमांचे पालन बसवली आहे. ज्या मंडळांकडे मंदिराची सोय उपलब्ध नाही अशा मंडळांनी परिसरातीलच दुकान गाळ्यात मूर्तीची प्र्रतिष्ठापना केली आहे. शहरातील मानाचा गणपती असलेल्या शनिवार चौकातील जयहिंद गणेशोत्सव मंडळाने शासनाच्या नियमाप्रमाणे मंडप घातलेला असतानाही त्यांना पोलिसांनी मंडप काढण्याची सूचना केली. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी समजूतदारपणे हिंद टी हाउसच्या दारात फक्त सव्वा फूट उंचीची पंचधातूची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतल्याने हा वाद निवळला.
ज्या मंडळाच्या गणेशमूर्ती या कायमस्वरूपी आहेत मात्र त्या 10 ते 15 फुटापर्यंतच्या आहेत त्यांनी आपल्या त्याच मूर्तींची चार फुटाच्या आतील मूर्ती बसवली आहे. अनेक मंडळाच्या मंडपात आरती व्यतिरिक्त कार्यकर्ते दिसत नव्हते. काही मंडळांनी लाउडस्पीकर लावले होते. मात्र आवाजाचे निर्बंध पाळण्यात आले होते. अनेक मंडळांनी सकाळी आरतीच्या वेळेतच लाउडस्पीकर सुरू केला होता.