
स्थैर्य, फलटण, दि. २० ऑक्टोबर : तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटामध्ये जम्बो प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक आणि विशेष माहिती फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी ‘स्थैर्य’ला दिली आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे गटाला मोठे बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फलटणच्या राजकारणात पक्षबदलाचे वारे वाहत आहेत. ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काही नगरसेवकही गट सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, श्रीमंत विश्वजितराजे यांनी दिलेल्या या माहितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राजे गटातून बाहेर पडणाऱ्यांची चर्चा सुरू असतानाच, आता गटात मोठ्या संख्येने इनकमिंग होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
‘स्थैर्य’शी बोलताना श्रीमंत विश्वजितराजे म्हणाले, “आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तालुक्यातील विविध पक्षांमधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते लवकरच राजे गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. हा केवळ साधा पक्षप्रवेश नसून, एक प्रकारे ‘जम्बो’ प्रवेश सोहळा असेल.”
हे पक्षप्रवेश नेमके कधी होणार किंवा कोणकोणते नेते व कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत, याबाबत त्यांनी अधिक तपशील दिला नसला तरी, निवडणुकीच्या अगदी तोंडावर हे प्रवेश होतील, असे त्यांनी सूचित केले. यामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत राजे गटाची ताकद वाढणार असून, कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह संचारणार आहे.
राजे गटाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता श्रीमंत विश्वजितराजे यांनी या संभाव्य पक्षप्रवेशाची माहिती दिल्याने, गट केवळ बचावात्मक भूमिकेत नसून, आपली ताकद वाढवण्यासाठीही सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
या संभाव्य पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील कोणत्या पक्षांना खिंडार पडणार आणि याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.