दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
आज एकविसाव्या शतकात हिंदी भाषेच्या शिक्षणातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. हिंदी विषय घेऊन शिक्षण घेत असतानाच हिंदी भाषेमधून आपल्या अभिव्यक्ती क्षमता विकसित केल्या तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन दहिवडी कॉलेज दहिवडीचे हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. किशोर पवार यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय फलटण, हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित हिंदी दिवस समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. (डॉ.) किशोर पवार उपस्थित होते.
डॉ. किशोर पवार पुढे म्हणाले की, हिंदी भाषेचे विस्तारित प्रयोजनमूलक स्वरूप मूलभूत दृष्टया समजावून घेतले तर हिंदी भाषेच्या परिपूर्ण ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थ्यांना आज विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आजच्या काळात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार कोणत्याही शाखेचा विद्यार्थी भाषा विषय घेऊन त्या भाषेचे ज्ञान प्राप्त करू शकतो. विद्यार्थ्यांनी पारंपारिक नोकरीच्या मागे न लागता हिंदी अनुसंधान अधिकारी, हिंदी अनुवादक, पत्रकारिता, टेलिव्हिजन व सिनेमा, मीडिया, यासारख्या क्षेत्रांकडे नोकरीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर बँक, रेल्वे या विभागांमध्ये देखील हिंदी विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विषयाची आवड, इच्छाशक्ती व प्रामाणिकपणा या गुणांवर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) पी. एच. कदम सर यांनी हिंदी भाषा ही लोकांना एकमेकांशी जोडणारी हृदयाची भाषा आहे, असे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार भाषा कौशल्य आधारित ज्ञान आत्मसात करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. हिंदी भाषेच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवजन्य ज्ञानातून नोकरीच्या व उद्योजक बनण्याच्या अनेक संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात हिंदी विभागप्रमुख प्रो.(डॉ.) नितीन धवडे यांनी हिंदी दिवस साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून, विद्यार्थ्यांनी साहित्य वाचनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता सांगितली. आजच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे मत त्यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रो. (डॉ.) अशोक शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक, प्रो. (डॉ.) टी. पी. शिंदे, अग्रणी महाविद्यालय योजना, समन्वयक प्रा.सौ. रुक्मिणी भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागामार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धां मध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
वकृत्व स्पर्धेत कु. स्नेहलता बिचुकले, कु. ऐश्वर्या कदम, श्री. वेदांत मोरे यांनी तर निबंध स्पर्धेत कु. वैष्णवी कुंभार, कु. अस्मिता गोरे, कु. अबोली पिंगळे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रो.(डॉ.) अशोक शिंदे व प्रा. डॉ. सौ .सरिता माने यांनी काम पाहिले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सविता नाईक निंबाळकर यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार प्रा. किरण सोनवलकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संजय जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.