प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १९ : सध्या सातारा जिह्यामध्ये करोनाने हाहाकार माजवला असून सातारा जिल्हावासियांचा काळजाचा ठोका वाढू लागला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसापूर्वी संशयित म्हणून 15 तारखेला 73 जणांचे घश्यातील नमुने घेण्यात आले होते. सदर स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले, मात्र तेथून गेलेले 73 जनाचे स्वॅपचे रिपोर्ट गेल्या चार दिवसांपासून आले नाहीत. मात्र 16 तारखेचे रिपोर्ट आले असून 15 तारखेला घेतले 73 जण रिपोर्टच्या प्रतीक्षेत लटकले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी ठेवण्यात आलेल्या 73 जणांचा करोना बाधित आला तर इतर क्कॉरंटाईन नागरिकांना याचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अहवालानंतर रिपोर्ट जर निगेटिव्ह आल्यानंतर बाकीच्या निगेटिव्ह लोकांना घरी सोडण्यात आल्यानंतर जर यातील चारजणांना करोना सेंटरमध्ये करोनाची बाधा झाली तर पुन्हा घरी गेल्यानंतर ते 4 जण 40 जणांना बाधा पोहोचू शकतात. त्यामुळे हा हलगर्जीपणा प्रशासनाचा की लॅब टेस्टिंग करणाऱ्यांचा याची चौकशी होणे गरजेचे आहे. एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार 93 स्वॅब 24 तास जिल्हा सिव्हिलमध्ये पडून आहेत, अशी माहिती एक वरिष्ठ डॉक्टर दिली आहे. कालचे 420 स्वॅब तसेच पडून आहेत अशीही खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

या 73 जणांना शासनाने स्वॅब घेतल्यानंतर वाई येथील किसनवीर कॉलेज येथे क्वारन्टाईन करण्यात आले आहे. जर 73 जणांपैकी तीन जण फक्त पॉझिटिव असतील आणि बाकीचे 70 निगेटिव्ह असतील तर नाहक 70 जणांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे करोनाची बाधा होऊ शकते. गेल्या चार दिवसापासून एकाच सेंटरमध्ये करोनाचे पेशंट, त्याचबरोबर ज्यांचे स्वॅब दिले असून रिपोर्टच्या प्रतिक्षेत काही जण आहेत, तेही लोक इतर क्वारन्टाईन केलेल्याबरोबर एकत्र वावरत आहेत. त्यांना पाच फुटाच्या अंतरावर बेड जरी असले तरीसुद्धा जोपर्यंत आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत कुठलाही सर्वसामान्य माणूस काळजी घेत नाही. यामुळेच रिपोर्ट आल्यानंतर जर का 70 निगेटिव्ह आणि तीन पॉझिटिव्ह निघाले व चार दिवस त्या ठिकाणी राहिल्यानंतर 70 जणांना घरी सोडले तर 70 जणांपैकी कमीत कमी पंधरा तरी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेच पंधराजण पुन्हा आपल्या गावात व घरी जाऊन शेकडो जणांना कोरोनाची लागण करु शकतात. ही बाब शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज असून जेवढे स्वॅब टेस्टिंग करण्याची कॅपॅसिटी आहे, तेवढय़ाचेच स्वॅब टेस्टिंग करावे.  जे संशयित आहेत त्यांना होम क्वारन्टाईन करून त्यांना कोरोनाची बाधा होण्यापासून वाचवावेत. कमीत कमी ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही अशाचे तरी जीव शासन व प्रशासनाने वाचवावेत, अशी चर्चा सध्या वाई परिसरामध्ये  होऊ लागली आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!