मनोज जरांगे पाटील यांची तोफ शुक्रवारी फलटणनगरीत धडाडणार; छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
जालना जिल्ह्यातील मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील शुक्रवार, दि. २० ऑटोबर रोजी फलटणनगरीत येणार आहेत. फलटणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार्‍या जाहीर सभेत त्यांची तोफ धडाडणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या फलटण येथील समन्वयकांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजोळी फलटण येथे शुक्रवार, दि.२० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाला ओबीसीतून तसेच ५० टक्केच्या आतमध्ये आरक्षण मिळावे यासाठी झगडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ते फलटण येथे येत असून त्यांचे मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायं. ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून तसेच ५० टक्केच्या आतमध्ये आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी, ता. अंबड जि. जालना येथे आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने लाठीहल्ला केला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांच्या नजरेस आले. हा माणूस प्रशासनाने दिलेल्या अनेक भूलथापांना बळी न पडता आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे.

राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण द्यावे यासाठी अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे कोट्यवधी मराठा समाज एकत्र करून १४ ऑक्टोबर रोजी जागतिक विक्रम करीत मोठी सभा घेतली व आठ दिवसांचा राज्य सरकारला अल्टीमेटम दिला असून प्रथमच जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्रात येत असून ते ऐतिहासिक फलटण नगरीत येत आहेत.

दरम्यान, फलटण येथे होणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक सभेला मुलाबाळांच्या भवितव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून बंधू-भगिनींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!