
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
पतंग पंचमी झाली, तरीही विचित्र मानसिकतेतून पतंग उडविण्यासाठी वापरलेला चायनीज मांजा फलटणकरांची पाठ सोडेना झाला आहे. तथापि, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर पडलेला चायनीज मांजा गोळा करून त्याची होळी केली.
चायनीज मांजामुळे फलटणकरांनी काही वर्षांपूर्वी लहान मुलांचा मृत्यू पाहिला आहे, याहीवर्षी अनेकजण या मांजामुळे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस कारवाई, सामाजिक जागरूकता, सोशल मीडिया अशा अनेक बाबींतून चायनीज मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु तरीही चायनीज मांजाचा वापर झाला आहे.
फलटण येथील नुकतीच नागपंचमीच्या सणाला पतंग पंचमी साजरी करण्यात आली. यातही चायनीज मांजाचा वापर झाल्याने अनेक नागरिकांना इजा झाली व अनेकजण जखमी झाले. वापरलेला मांजा शहरातील रस्ते, झाडांवर, घरावर आढळून आला आहे. हा मांजा शहरातील संवेदनशील नागरिक राहुल शहा, राजकुमार देशमाने, मोहनराव जामदार, मनीष जामदार यांनी गोळा करून त्याची होळी केली व शहरातील नागरिकांना या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे.
गेली अनेक वर्षे हे सर्वजण पतंग पंचमी दरम्यान चायनीज मांजाने इजा होत असल्याने रात्रीत रस्त्यावर फिरून मांजा एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावण्याचे कार्य करीत आहेत. त्यांचे या कार्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.