
स्थैर्य, साखरवाडी, दि. 30 सप्टेंबर : साखरवाडी शिक्षण संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या साखरवाडी विद्यालयातील तांत्रिक विभागाच्या कार्यशाळेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष धनंजय प्रल्हादराव साळुंखे यांनी या सभेचे अध्यक्षस्थान भूषवले.
प्रारंभी, संस्थेच्या सचिव सौ. उर्मिला जगदाळे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर या वर्षात निधन झालेल्या मयत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेत तीन प्रवर्गातील संचालकांची तीन वर्षांची मुदत संपल्याने त्यांची फेरनिवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये धनंजय साळुंखे व राजेंद्र यशवंत शेवाळे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. ‘आश्रयदाते’ प्रवर्गातून मात्र कौशल राजेंद्र भोसले यांच्या विरोधात माणिक शिवराम भोसले यांनी उमेदवारी जाहीर केल्याने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत माणिक शिवराम भोसले हे संचालकपदी नियुक्त झाले.
नूतन संचालकांचे यावेळी स्वागत करण्यात आले. सभेस संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील, ज्येष्ठ सभासद हिरालाल पवार, पांडुरंग भोसले, सुरेश पवार यांच्यासह संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.