विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यंत असणार आहे, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ पर्यंत साधारण रुपये २२हजार ६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
योजनेतील पिके
भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस, कांदा.
सहभागी शेतकरी
अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे बंधनकारक आहे.
योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत – ३१ जुलै २०२३
सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः ७० टक्के
विमा हप्ता : सर्व पिकांसाठी प्रती अर्ज फक्त एक रुपया.
उंबरठा उत्पादन :
अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.
यासाठी मिळेल संरक्षण
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.
पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान : यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर,पावसातील खंड,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०टक्यांहून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.
काढणी पश्चात चक्रीवादळ,अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
युद्ध व युद्धजन्य परिस्थितीमुळे होणाऱ्या व हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही.
ई-पीक पाहणी:
शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
या विमा कंपन्या देणार जिल्हानिहाय सेवा
भारतीय कृषी विमा कंपनी (वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, बीड), ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. (नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा), आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(परभणी,वर्धा, नागपूर),युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ( नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग),एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(हिंगोली,अकोला, धुळे,पुणे, उस्मानाबाद), युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(जालना, गोंदिया, कोल्हापूर), चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड),रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(यवतमाळ, अमरावती, गडचिरोली), एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(लातूर),खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय फरक संभवतो
पीकनिहाय विमा संरक्षणाची रक्कम (रुपये प्रति हेक्टर)
भात (₹ ४० हजार ते ५१ हजार ७६०),ज्वारी (₹ २० हजार ते ३२ हजार ५००),बाजरी (₹ १८ हजार ते ३३ हजार ९१३),नाचणी (₹ १३ हजार ७५० ते २० हजार ),मका (₹ ६ हजार ते ३५ हजार ५९८), तूर (₹ २५ हजार ते ३६ हजार ८०२),मूग (₹ २० हजार ते २५ हजार ८१७),उडीद (₹ २० हजार ते २६ हजार ०२५),भुईमूग (₹ २९ हजार ते ४२ हजार ९७१),सोयाबीन (₹ ३१ हजार २५० ते ५७ हजार २६७),तीळ (₹ २२ हजार ते २५ हजार ),कारळे (₹ १३ हजार ७५०),कापूस (₹ २३ हजार ते ५९ हजार ९८३),कांदा (₹ ४६ हजार ते ८१ हजार ४२२)
नुकसान भरपाईसाठी
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक. ही सूचना केंद्र शासन पीक विमा ॲप, संबंधित विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे तालुका / जिल्हास्तरीय कार्यालय, संबंधित बँक, कृषी/महसूल विभागाद्वारे देण्यात यावी. यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.
खरीप २०२३ च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.
सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास ३० टक्के आणि पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास ७० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे .
नुकसान भरपाई मिळण्यासाठी…
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा APP, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे.यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.
संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.
विमा योजनेतंर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदविण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी.
सहभागी होण्यासाठी…
अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.
इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.
कॉमन सर्विस सेंटर आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता.
महत्त्वाच्या नवीन बाबी
या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल.म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी.
या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ३० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास ७० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे .
भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पीक विमा पोर्टल वर अपलोड करावी लागेल.
पीक विमा योजनेत सहभागी होण्यापूर्वी मयत असलेल्या शेतकऱ्याच्या नावे अथवा त्याचे नावे असलेल्या जमिनीवर विमा योजनेत भाग घेतल्याचे निदर्शनास असल्यास विमा अर्ज अपात्र होईल .
योजनेच्या अधिक व अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
०००
- रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार