त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पर्धेच्या युगात कल्पकतेला विशेष महत्व आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नाविण्य शोधणे हा मानवी स्वभाव आहे. हिंगोली येथील एम.ए, बीएड उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकांनी कल्पतेचे रुपांतर व्यवसायामध्ये केले आहे.

दोन वर्षापूर्वी  राज्यासह देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी त्यांना कोरोनाने ग्रासल्यामुळे त्यांचा स्कोअर जवळपास 17 झाला होता. या परिस्थितीत त्यांनी शासकीय रुग्णालयात दीड महिना कोरोनाशी झुंज दिली. कोरोनाच्या या आजारातून बरे झाल्यानंतर नव्या उमेदीने त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन 10 लोकाची त्रिलोकेश या नावाने फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. हिंगोली येथील प्रविणनगर मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकाने दोन वर्षापूर्वी भुसार माल खरेदी-विक्री करण्याच्या अनुषंगाने 10 जणाची सदस्य संख्या असलेली  त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीची  स्थापना केली  होती. सहा ते सात महिन्यापूर्वी कृषि विभागातील आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांच्याकडून माहिती मिळताच त्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना (पोखरा) अंतर्गत धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छता व प्रतवारी युनिट) स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. तसेच धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट कोठे उपलब्ध होते. याची ऑनलाईन माहिती घेतली. शेतकऱ्यांचा व आपला फायदा झाला पाहिजे यासाठी  धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कंपनीच्या एका सदस्याची 1200 स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने घेतली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून पैशाची जुळवाजुळव करुन राजकोट येथून धान्य स्वच्छता व प्रतवारी मशीन आणली. याचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे उपस्थित होते.

धान्य स्वच्छता व प्रतवारी  मशीनद्वारे एका तासाला 15 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्याची क्षमता आहे. संपूर्ण मशिनरी युनिट व बांधकामासाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च करण्यात आला. यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोखरा) योजनेतून 60 टक्के म्हणजेच 12 लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे.

पहिल्या वर्षी मनावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू सोयाबीन, हरभरा, गहू या बियाण्याची स्वच्छता करुन मोफत बीज प्रक्रिया करुन दिली.

लोकांना चांगल्या प्रतीचा गहू, ज्वारी उपलब्ध व्हावा यासाठी हिंगोली पासून जवळच असलेल्या जवळा बाजार येथून सहा ते सात हजार क्विंटल गव्हाची खरेदी केली. या गव्हाची स्वच्छता व प्रतवारी करुन पॅकींग करुन विक्री करण्यास सुरुवात केली.

सध्या त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या प्रत्येक सदस्यांनी आपापल्या शेतात प्रत्येकी पाच एकर गव्हाची लागवड केली. कंपनीच्या सर्व सदस्यांना फायदा व्हावा यासाठी सदस्याचे गहू बाजारभावापेक्षा 200 रुपये जास्तीचे दर देऊन खरेदी करण्यात येत आहे. तसेच काही सदस्यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या गव्हाला पुणे येथे मागणी असून हा गहू 3500 रुपये क्विंटल दराने पाठविण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.

या मशीनद्वारे दिवसाला 60 ते 80 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्यात येत आहे. या मशीनवर काम करण्यासाठी चार कामगार आहेत. त्यांना सर्वांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे दरमहा पगार दिला जातो. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता दिवसाला सात ते आठ हजार रुपये निव्वळ नफा होत आहे.

धान्य ठेवण्यासाठी  जागा कमी पडत असल्याने  सध्या असलेल्या जागेला लागून परत 1200 स्क्वेअर फुटाची  जागा भाड्याने घेतली आहे. तसेच नरसी फाटा येथे 150 मेट्रिक टन क्षमतेचे एक गोडाऊन भाड्याने घेतले आहे.

तसेच सोयाबीन, हरभरा, गहू ब्रीडर शेडपासून बियाणे निर्मिती चालू आहे. सोयाबीन, हरभरा व इतर अधिक उत्पादन देणारे दोन हजार क्विंटल बियाणे तयार होणार आहे. धान्याची स्वच्छता व प्रतवारी करुन शिल्लक राहिलेल्या चुऱ्यापासून पीठ व कोंबड्यासाठी भरडधान्य तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच साखरेला पर्याय म्हणून गुळ पावडर तयार करण्याचे नियोजन असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

हिंगोली येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर वेगवेगळ्या जातीचे जसे लोकवण, काळा गहू, खपली गहू,अजित, 2189 व इतर विविध प्रकारचे गहू विक्रीसाठी  ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात 200 ते 250 क्विंटल गव्हाची विक्री झाली आहे. भविष्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील डीमार्ट, रिलायंस मॉल यांना गहू उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

अवघ्या सहा ते सात महिन्याच्या अल्प कालावधीत श्री. पाटील यांनी त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्राच्या माध्यमातून त्यांनी गगन भरारी घेत ते आज इतरांसमोर आदर्श ठरले आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी, महिला, भूमीहीन व्यक्तींचे इच्छूक गट,  बचत गट यांच्या व्यवसायिक प्रस्तावांना अर्थसहाय्य दिले जाते. पोखरा अंतर्गत शेतकरी, उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटांनी प्रकल्प उभारण्यासाठी  या अनुदान योजनेचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम होण्याची गरज असल्याचे ते सांगतात.

                                                                                                            — चंद्रकांत कारभारी

                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                    जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली


Back to top button
Don`t copy text!