स्थैर्य, फलटण : सोलापूर वरुन रविवार पेठ, फलटण येथे आलेली ७० वर्षीय महिलेची मृत्यूनंतर घेतलेली करोनाच्या चाचणीचा अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे तर तळेगाव वरुन मंगळवार पेठ, फलटण येथे आलेल्या ६२ वर्षीय पुरुषाच्या पण करोना चाचणीचा अहवालही पाॅसिटीव्ह आलेला आहे. फलटण शहरातील रविवार पेठ व मंगळवार पेठ येथे सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र जाहीर केले असून फलटण नगरपालिकेमार्फत सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रामधील सर्व घरांची आशा वर्कक्स मार्फत प्राथमिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप व फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
फलटण शहरात मंगळवार दि. ९ जून रोजी सायंकाळी ७० वर्षीय महिला रविवार पेठेत मुलासमवेत सोलापूर येथून दुचाकीवर विनापरवाना आली होती. बुधवारी तीला त्रास जाणवू लागल्याने लगतच्या डॉक्टरकडे तीला नेण्यात आले होते, परंतू पुन्हा तीला त्रास जाणवू लागल्याने तीला दुसर्या डॉक्टरांकडे नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तीचा उलट्या, जुलाब होउन मृत्यू झाला. सदरची घटना समजताच दुपारी साडेबाराच्या दरम्यान तीचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचबरोबर मंगळवार पेठेत तळेगाव येथून एक ६२ वर्षीय इसम आपल्या घरी आला होता. तो लुधियाना, पंजाब परिसरातून तळेगाव व तेथून फलटण येथे शुक्रवार दि. १२ जून रोजी आला होता. परंतू फलटण येथे आल्यावर सायंकाळी त्यास लक्षणे दिसू लागल्याने मुलगा व जावई यांनी खाजगी दवाखान्यात नेले तेथे त्यांनी एक्स रे काढण्यास सांगितल्याने अन्य मोठ्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. एक्स रे मध्ये लक्षणे दिसून आल्याने त्यांना शनिवार दि. १३ जून रोजी दुपारी सातारा येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.
यानंतर सायंकाळी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी रात्री उशीरा मृत महिला व संबंधित इसमाचे अहवाल पॉसिटिव्ह आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या नंतर संमंधित ठिकाणी प्रांत अधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. या नंतर मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉनट्याक्टमधील २२ जणांना शेती शाळेतील विलगिकरण कक्षात तर अन्य चौघांना सोलापूर येथे विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. तर मंगळवार पेठेतील इसमाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉनट्याक्टमधील १० जणांना जाधववाडी ( फ ) येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सदर घटनेनंतर प्रांत अधिकारी शिवाजी जगताप यांनी बारामती चौक ते माता रमाई चौक ते भगवाण सॉ मिल ते बारामती चौक हा परिसर सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तर उर्वरीत मंगळळवार पेठेचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.
फलटणमध्ये 2855 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील करोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये १२ जण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये 52 जण आहेत. व संस्थांमक विलीगिकरण कक्षात 42 जण आहेत. असेही या वेळी जगताप यांनी स्पष्ट केले.