
दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । सातारा । घटनेची मोडतोड करुन अस्तित्वात आलेल्या असैविधानिक शिंदे-फडणवीस सरकारची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘रयतेच्या’ राज्याशी, हिंदवी स्वराज्याशी करुन व एकनाथ शिंदे म्हणजे प्रतीशिवाजी असल्याचे बाष्कळ विधान करुन बीजेपीचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी तळहातावर प्राण घेऊन लढलेल्या मावळ्यांचा घोर अपमान केला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा यापुढे त्यांना सातारा जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही. आणि जर कोणाच्या आधाराने आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेंद्र शेलार यांनी व्यक्त केली आहे.
शिवप्रताप दिनी प्रतापगडावरील कार्यक्रमात बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांचे अद्वितीय कार्य छोटे करण्याचा प्रयत्न बीजेपी नेहमीच करीत आलेली आहे. शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात असलेला व्देष त्यांच्या अनेक भाटांच्या मुखातून सध्या बाहेर पडत आहे. आज मंगलप्रभात लोढा या नव्या भाटाची त्यात भर पडली. शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याला केवळ अफजल खानाचा मुडदा पडला नव्हता, तर खानाचा भाट असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचाही मुडदा पडला होता. कदाचित इतिहासातील हेच वास्तव बीजेपीवाल्यांना सलत असावे. म्हणून महाराजांचा पदोपदी अपमान करणारे उदगार ते काढत आहेत. एकाने मारायचे व दुसऱ्याने सारवासारव करायची हे बीजेपीचे कटकारस्थान आता महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. साताऱ्यातील जनता यापुढे स्वस्थ बसणार नाही. मंगलप्रभात लोढांनी तातडीने माफी मागावी अन्यथा यापुढे त्यांना सातारच्या भूमीवर पाऊल ठेऊ देणार नाही. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या किंवा इतरांच्या आश्रयाने येण्याचा प्रयत्न केला तरी ते जेथे येतील तेथे जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आला आहे.
राजेंद्र शेलार, सातारा
सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.