दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । आटपाडी । ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दलित जीवनाचे भाष्यकार, आंबेडकर यांच्या महानिर्वाण काळानंतर त्यांच्या वृत्तपत्रातून आंबेडकरांचे विचार पुढे नेलेले विद्वान, कथाकार व लेखक अशी त्यांची ओळख. त्यांचा जन्म ११ जुलै १९२१ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे झाला . याचा आम्हा आटपाडीकरांना अभिमान वाटतो.
भारतातील विद्यापीठ स्थापनेच्या १४३ वर्षाच्या प्रदिर्घ इतिहासात १९७५ हे साल सुवर्ण अक्षरांनी लिहिण्या सारखे होते . डॉ .शंकरराव खरात नावाच्या एका दलित व्यक्तीची निवड तत्कालीन मराठवाडा आणि आजचे डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदी झाली होती . चंद्रभागेच्या वाळवंटात डॉ . आंबेडकरांची सभा ऐकून प्रभावीत झालेल्या आणि पुढे त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या कार्यात सहभागी झालेल्या, धर्मांतराच्या ऐतिहासीक प्रसंगी उपस्थित असलेल्या आणि बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या प्रबुद्ध भारतचे संपादक पद सांभाळलेल्या व्यक्तीमत्वाचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे .
डॉ .शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जीवनाचा वेध घेताना त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याचे दर्शन आपणास त्यांच्या साहित्यातून घडतेच . तराळ – अंतराळ हा ५०० पानांचा ग्रंथ खुपच उपयोगी पडतो . पण त्याही पलीकडे शंकरराव खरात खुप काही आहेत . एका लेखात त्यांचे कार्य कर्तृत्व संपूर्णपणे सांगता येणे मुश्कील . पण दलित समाजाच्या स्थित्यंतरांचे आणि क्रांतीचे चक्र फिरताना ते बहरत होते . ही क्रांती अपूर्ण राहीली हे वास्तव त्यांनी मांडले . जाती व्यवस्थेतेतून समाज व्यवस्थेपर्यत लोकशाही काळात आसा सह चक्र पुर्ण फिरले पाहीजे तरच क्रांती होईल हा सिद्धांत मांडणाऱ्या शंकरराव खरात यांनी दगड, प्राण्यात सुद्धा देव पाहणाऱ्या समाजाला, माणसात देव पाहण्याचे आवाहन केले . कोणी उच, नीच, शुद्र मानला जावू नये यासाठी समाजाने बदलले पाहीजे . हा आग्रह धरतानाच शोषीतांनी स्वतःच्या सुधारणेसाठी स्वतःही झटले पाहीजे . हे शंकरराव खरात आयुष्यभर सांगत राहीले . आजही समाजातील छोट्या मोठ्या मागास जाती आहेत. त्यांना शंकरराव खरात यांचे हे विचार जाणून वाटचाल करणे गरजेचे आहे.
आटपाडीच्या एका महार कुटुंबात शंकररावांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामा महार हे गावाचे वतनी महार म्हणून काम पाहायचे. पूर्वीच्या काळी असलेली विषमता त्यांच्याही पाचवीला पुजलेली होती. ते महार जातीचे असल्याने त्यांना अस्पृश्यतेचे चटके खावे लागले होते. अस्पृश्यतेच्या सावटाखाली असतानाही ते गावातील शाळेत शिकू लागले. गावात चौथीपर्यंत शाळा होती, जी कलेश्वराच्या मंदिरात, पत्कींच्या वाड्यात भरायची. येथूनच त्यांनी आपले चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची आवड असल्याने मॅट्रिकचे (अकरावी) शिक्षण घेण्यासाठी ते औंधला गेले, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पूर्ण केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, सामाजिक विषमतेचे चटके त्यांना लहानपणापासून बसले होते. त्याकाळी महारांवर चॅप्टर केसेस लावल्या जायच्या. मात्र, या केसेस लढवण्यासाठी महारांकडे वकील नसायचा किंवा वकिलाला देण्याइतपत त्यांच्याकडे पैसा नसायचा. आपल्या बांधवांची ही विदारक अवस्था ते लहानपणापासून पाहत आले होते. आपण आपल्या बांधवांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि याच भावनेतून त्यांनी १९४७-४८ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण करत वकिली व्यवसायाला सुरुवात केली. दलित व गरिबांवरचा अन्याय त्यांना पाहवत नव्हता. यामुळे त्यांच्यावर चालवल्या जाणाऱ्या खोट्या केसेस शंकरराव अत्यल्प खर्चात किंवा मोफत लढत असत. शंकररावांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक प्रभाव होता. त्यांच्या प्रभावामुळे त्यांना समाजकार्याची आवड निर्माण झाली. आपली आवड आणि आपल्या व्यवसायाची सांगड घालत, ते वकिली व्यवसायामार्फत समाजसेवा करू लागले. याच काळात त्यांचा ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’, विमुक्त भटक्यांच्या संघटनांशी संपर्क आला . उपेक्षितांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अशा संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढत गेला. त्यांचे सेवाभूमीक काम उपेक्षितांच्या मनात घर करून गेले. विद्यार्थी दशेत असताना त्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला होता. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले शंकरराव उपेक्षितांचे प्रश्न सोडवत असताना बाबासाहेबांच्या विचारांचाही प्रसार करू लागले. शंकररावांचे कार्य उपेक्षितांपुरते मर्यादित राहिले नाही , भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भूमिगत कार्यकर्त्यांना ‘ सायक्लोस्टाईल’ केलेली पत्रके ठरलेल्या खासगी जागी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते. ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या संघटनेत काम करता करता त्यांचा कामगार चळवळीत सक्रिय सहभाग वाढत गेला . कामगार चळवळ व उपेक्षितांसाठीच्या अनेक संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध पदे भूषवली. सामाजिक चळवळीत कार्यरत असताना दलित जीवनावर आधारित कथा, कादंबऱ्या त्यांच्या वाचनात येऊ लागल्या. मात्र, हे लिखाण आपण अनुभवलेल्या व पाहिलेल्या दलितांचे जीवन नसून आपण वाचलेले लिखाण कृत्रिम असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे खरे दलित जीवन काय आहे? त्यांचे प्रश्न काय आहेत? हे आपण आपल्या लिखाणातून उतरवायचा त्यांनी निर्धार केला. यानंतर १९५६-५७ मध्ये ‘नवयुग’ दिवाळी अंकात त्यांची ’सतूची पडिक जमीन’ ही पहिली कथा प्रकाशित झाली. आपल्या पहिल्याच कथेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांची १९५७-५८ साली ’माणुसकीची हाक’ ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी प्रकाशित झाली आणि गाजलीही .
यानंतर साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले आणि तेव्हापासून त्यांची साहित्यसाधना अखंडपणे चालू राहिली. ‘आज इथं तर उद्या तिथं,’ ‘आडगावचे पाणी,’ ‘गावचा टिनपोल गुरुजी,’ ‘गाव-शीव,’ ‘झोपडपट्टी,’ ’टिटवीचा फेरा,’ ‘तडीपार,’ ‘दौण्डी,’ ‘फूटपाथ नंबर १,’ ‘बारा बलुतेदार,’ ‘मसालेदार गेस्ट हाऊस,’ ‘माझं नाव,’ ‘सांगावा,’ ‘सुटका,’ ‘हातभट्टी’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली, तर ‘तराळ – अंतराळ’ हे आत्मचरित्र लिहिले. यासोबतच महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य व डायरेक्टर, बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स सिलेक्शन कमिटी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, रेल्वे सर्व्हिस कमिशन, मुंबई या संस्थेचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे सदस्य इ. महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून १० जानेवारी, १९७५ ला मराठवाडा, विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यासोबतच १९८४ साली जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.
अशा या बहुरंगी व्यक्तिमत्वाची प्राणज्योत ९ एप्रिल, २००१ रोजी मालवली.
आटपाडी आणि शंकरराव खरात
आठवणींचे पक्षी नव्या शतकाच्या पहिल्या दिवसाची पहाट अनुभवण्यासाठी पूर्वसंध्येला आटपाडीला आलेल्या खरात साहेबांनी असंख्य आठवणी बोलुन दाखवल्या. त्या दोन दिवसात त्यांच्या समवेत अनेक किलोमीटरची पायपीट करीत आटपाडी शहर – परिसर फिरण्याचे, त्यांच्याशी बोलण्याचे , त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या भावना शब्दबद्ध केलेल्या प्रयत्नालाही नंतर त्यांनी शाबासकी . याचा साक्षीदार बनण्याचा योग नियतीने मला मिळवून दिला .
३१ डिसेंबर, १९९९ रोजी भल्या पहाटे आटपाडी येथे गावच्या व परिसराच्या विलक्षण ओढीने आवर्जून आलेला हा माणदेशी राजा! मनात आठवणीचा कल्लोळ, मावळत्या शतकाचा हिशोब, ‘हरवले ते गवसले का?’ हे जाणून घेण्याची धडपड, त्याचबरोबर नव्या शतकाचा म्हणजे १ जानेवारी २००० चा सूर्योदय मायभूमीतून पहावा ही ओढ. या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून काही संकल्प सोडावेत ही जिद्द. या साऱ्या संमिश्र भावनांनी व सवंगड्यांच्या भेटीगाठींनी हा दिवस साजरा करण्याची कल्पनाच अभिनव होती. त्यांच्या आठवणीचे पक्षी भुर्रकन उडत होते. ७९ वर्षाचा जीवनपट सहजपणे उलगडत गेला, अनेक कटू-गोड आठवणींनी त्यांचे मन झाकोळून गेले, ‘माझे ! आटपाडी’ गाव, माझे मित्र व त्यांच्या घरातली कर्ती मंडळी, माझे शेजारी, गावचा आठवडा बाजार, बाजारातील इतर पदार्थ आंबे खाण्यासाठी केलेला आटापीटा, शेरडे राखण्याचे ते दिवस, ते सवंगडी, त्या आठवणी, राहत्या छपराची पावसाळ्यात उडणारी दैना , कल्लेश्वर मंदिरातील, पत्की वाड्यातील ती शाळा, जाती व्यवस्थेचे बसलेले भयाण चटके, त्यातून मिळालेला मास्तरांचा मार, पिण्याच्या पाण्याच्या आडावर घडलेला तो जीव घेणा प्रसंग, गावची जत्रा, जत्रेतल्या अनेक गोष्टींसाठी कासावीस झालेला जीव, झाडावर पेंगत वडिलांसमवेत बघितलेला तमाशा आणि नंतर कनात उघडून तमाशात शिरताना झालेली अवस्था, गांवाकडेने सतत खळाळत्या पाण्याने वाहणारा तो ओढा. बाजारात खापराच्या लोटक्यामध्ये तूप आणून ‘ते विकत बसणारा तो कोष्टी किंवा हातात आरसा देवून पुढ्यात बसणाऱ्याचा जमालगोटा बनविणारा न्हावी, त्याकाळची रामा माळ्याची पेरूची बाग, किंवा गणा माळ्याच्या विहिरीवर दोन दोन मोटा ओढणारी ती खिलार बैले, सूर्यनमस्कार , व्यायामासाठी उभारण्यात आलेले ते सूर्योपासना मंदिर, खरसुंडीच्या ‘सासणाला’ जाताना चैत्र व्दादशीला ऐन उन्हाळ्यातही करंज ओढ्याच्या दुधाची चव देत खळखळ वाहणारा तो निर्मळ पाण्याचा झरा, ओढ्याच्या दुतर्फा एका रेषेतली वेगवेगळी डौलदार झाडे. आणि याच नैसर्गिक वातावरणात स्वच्छंदीपणे वावरणारे मोर, लांडोर, ससे, खोकडे, पोटच्या गोळ्याप्रमाणे असलेली आपली मेंढरे उघड्या माळावर चारीत, कोसन् कोस भटकंती करणारा तो मेंढपाळ, पाटलाच्या चावडीत दिवस रात्रीच्या रखवालीसाठी सदैव सतर्क असणारी ‘बशा जागत्या’ मंडळी आणि प्रसंगी वडिलांच्याबरोबर आपणास याच चक्रातून जावे लागलेले ते दिवस. भल्या पहाटे घरादारात ऐकू येणारी जात्यांची घरघर, त्यावरील गाणी, किंवा बैठ्या मागावर ‘ सटाडाक फटाडाक ‘, असा आवाज करीत कापड विणणारा तो विणकार, तराळकीच्या कामथ, बोंबेवाडी या गावात सणावाराला होणारी जीवाची तगमग, सैतान बनलेल्या माणसाला माणूस बनविणारी ती ‘स्वतंत्रपूरची खुली वसाहत’, ऐतिहासिक राजेवाडी तलाव व कैसरे हिंद हा कॅनॉलसाठीचा बोगदा, ते गुरूजी, ते सर, त्या बाई, तो शिरपा, तो तुका वगैरे सवंगड्यांच्या परिसरातल्या तत्कालिन खाणाखुणा, व्यवस्थेच्या आठवणी एक-एक करीत उलगडत होत्या. अंतःकरण भावपूर्णतेने गलबलून गेलेले, आठवणींचा हा पक्षी चटकन पंढरीच्या वाळवंटाकडे सरकला.
डॉ. आंबेडकर आणि शंकरराव खरात
१९३७ सालचे चंद्रभागेचे वाळवंट आठवले. महामानव डॉ. बाबासाहेबांचे शब्द कानावर पडले. तोच हा क्षण जीवनाला कलाटणी देणारा, नवे परिमाण प्राप्त करून देणारा. ‘उदात्त जीवनमुल्ये व सांस्कृतिक मुल्ये आपल्या साहित्य प्रकारातून सर्वा पुढे आणा . आपले लक्ष संकुचित, मर्यादित ठेवू नका, आपली वाणी चार भिंतीपुरती मर्यादित राखू नका, तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करू नका, त्यांच्या वेदना नीट समजावून घ्या’ हे बाबासाहेबांचे विचारधन नागपुरी वाळवंटातही वेचले व प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांनी जतन केले. त्यामुळे माणसं कळू लागली, दुःख समजू लागले, वेदना बोलकी करावीशी वाटू लागली अनुकंपेची फुंकर घालावीशी वाटू लागली. अठरापगड जातीचं अठराविश्व दारिद्र्य जवळून पाहता आलं. या मानसिक गुलामगिरी झुगारून दिल्याशिवाय नव्या स्वातंत्र्याची पहाट उगवणारचं नाही हे शंकरराव खरात साहेबांना इप्सित सापडले.