स्थैर्य, सातारा, दि.२: कोरोना संकमणामुळे लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे सातारा जिल्हयातील मंडप लाईट व फुले व्यापारी प्रचंड अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारच्या राहत पॅकेजच्या धर्तीवर राज्य सरकारने मंडप व्यावसायिकांना सहाय्य करून पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी सोमवारी मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ऑल महाराष्ट्र टेन्ट डिलर्स असोसिएशन च्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार सातार्यात मंडप व लाईट व प्लॉवर डेकोरेटर्स विविध मागण्यांसाठी रस्त्यावर आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम हादगे, उपाध्यक्ष महादेव सूर्यवंशी, सचिव रमेश साळुंखे, खजिनदार राजेश भोसले, यांच्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील आंदोलक सातार्यात एकत्र आले. शिवाजी सर्कल येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. निवासी उपजिल्हाधिकारी रमेश थोरवे यांना निवेदन सादर करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनात नमूद आहे की सातार्यात मंडप व्यवसायाशी संलग्नित एक लाख लोक असून गेल्या सात महिन्यापासून लॉक डाऊनमुळे प्रचंड अडचणीत आहेत.पाचशे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमास परवानगी, जीएसटी कर पाच टक्के, कर्मचार्यांचा पीएफ शासनाने भरावा, कर्जधारकांचे व्याज माफ करावे, मंडप व्यावसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, व्यवसाय कर्जावर सबसिडीची तरतूद, मंडप व्यावसायिकांना स्वतंत्र पॅकेज मिळावे, मंडप व्यावसायिकांना वेगवेगळ्या करांमध्ये सूट देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.