दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । फेरफार मंजूर करुन देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी धनंजय मधुकर भोसले (वय 52, मूळ रा.काशीळ ता.सातारा) या मंडल अधिकार्याला (वर्ग 3) सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. संशयित पुसेसावळी येथे सेवा बजावत असून मंगळवारी सायंकाळी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणातील तक्रारदार हा 22 वर्षीय युवक आहे. तक्रारदार याचे फेरफार संबंधी काम असल्याने मंडलअधिकारी धनंजय भोसले याच्याकडे गेला होता. संबंधित कामासाठी संशयिताने 1 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार युवकाने सातारा एसीबीत तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोनि सचिन राउत यांनी तपासाला सुरुवात करुन पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारली जाणार असल्याने एसीबी विभागाने सापळा लावला.
संशयित धनंजय भोसले याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती पुसेसावळी परिसरात पसरल्यानंतर शासकीय कार्यालयामध्ये खळबळ उडाली. रात्री उशीरापर्यंत औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस उपअधीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सचिन राउत, पोनि विक्रम पवार, पोलिस विनोद राजे, संभाजी काटकर, प्रशांत ताटे, तुषार भोसले, विशाल खरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.