यशस्वी व सुखी जीवनासाठी भावनांचे व्यवस्थापन गरजेचे – डॉ. गणेश लोखंडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । सातारा । व्यक्तिमत्व विकास ही निरंतर व गतिशील प्रक्रिया आहे. व्यक्ती दिसते कशी यापेक्षा व्यक्ती आहे कशी याला अधिक महत्त्व आहे. बाह्यरूप हा व्यक्तिमत्त्वाचा एक भाग असतो, परंतु अंतर्गत व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य जबाबदारीने वाढवणे आवश्यक असते. स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्या वाढवणे, स्व- कौशल्ये विकसित करणे, स्वतः च्या स्वभाव गुणांची समीक्षा करणे व समाजामध्ये स्वतःचे अंतर वैयक्तिक संबंध सुव्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात चांगले तसेच यशस्वी म्हणून ठसा उमटवयाचा असेल तर मेंदूच्या बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापना इतकेच भावनिक बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाची गरज आहे. असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणेश लोखंडे यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग व मानसशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'व्यक्तिमत्व व्यवस्थापन' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ.अनिलकुमार वावरे होते. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. लोखंडे म्हणाले की व्यक्तिला स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे आकलन करून त्याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. जीवनात नकारात्मकता, अपमान व मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना सुद्धा शांत पद्धतीने सामोरे जाता आले पाहिजे. मनोक्षमता ही आरोग्य क्षमता वाढवत असते. मन शरीराबरोबर चालते व जेथे मन शरीराची साथ सोडते तेथे आरोग्यात बिघाड सुरू होतो. व्यायाम, शांत झोप व समाजात मिसळणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असतात तर एकाकीपणा, जागरण व व्यसन हे आरोग्यास घातक आहे. व्यक्तीने स्वतःमधील ऋण स्थाने व बलस्थाने ओळखायला हवीत. स्वतःचे जीवन चिंतन स्व-अनुभवातून व वाचनातून विकसित होत असल्याने वास्तवाशी सुसंगत तार्किकतेला महत्व देऊन जीवन चिंतन करायला हवे. प्रत्येक नात्यातील जबाबदारी, भूमिका व कर्तव्ये समजून घेऊन ती निकोपने पार पाडणे आवश्यक
आहे. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सांगितले की आज केवळ साक्षरता वाढवण्याऐवजी उद्योजकता व कौशल्य आधारित शिक्षणाची अधिक आवश्यकता आहे. जगात समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करणाऱ्या तांत्रिक ज्ञानाला व कौशल्यांना महत्त्व आले आहे. ऑनलाईन शिक्षणात जीवन कौशल्ये देताना व आत्मसात करताना मर्यादा येतात. युवकांनी विषय ज्ञानाबरोबरच आवडीच्या व बाजारात मागणी असणाऱ्या कौशल्य क्षेत्रात करिअर करावे. कोरोना महामारी नंतरच्या जगात नोकऱ्या बाबतची स्थिती फार चांगली नाही. युवकांनी केवळ नोकरी करण्याकडे कल न ठेवता उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या
व्यक्तिमत्त्वाची जाणीवपूर्वकजडणघडणकरावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक- स्वागत व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयातील कौशल्य विकास विभागाचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करुन दिली. आभार उपप्राचार्य डॉ. रामराजे माने -देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र महाजन यांनी केले. यावेळी उपप्राचार्य रोशनआरा शेख, प्रा.[डॉ.] सुभाष वाघमारे, डॉ. रघुनाथ साळुंखे, प्रो. सविता मेनकुदळे, प्रो. डॉ.धनाजी मासाळ, प्रो. डॉ.शिवाजीराव पाटील व डॉ. धनंजय नलवडे यांचेसह प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!