
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा सातत्यानं केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रुपानं आणखी एक ‘माणूस’ आला आहे. खरं तर नारायण राणेंनी मागे असेच 1999 ते 2004 कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु, त्यात त्यांना यश आलं नाही,” हा दाखला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना चिमटा काढला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले. मात्र, अभिनंदन करतानाच त्यांनी ‘आता महाराष्ट्रावर लक्ष’ या राणेंच्या घोषणेचाही समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा जिल्ह्यात होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाबाबत अजित पवार म्हणाले, निवडणुकीत यश-अपयश येतचं असतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. मात्र, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगले यश मिळाल. मात्र सरकार पडणार हे सांगणारा माणूस नारायण राणे यांच्या रूपाने अवतरलाय. यापूर्वी सुध्दा त्यांनी सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती पण त्याचा उपयोग झाला नाही. आमचे सरकार अजिबात पडणार नाही.
सिंधुदुर्ग बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचं पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडं लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीवर मात करत भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलंय.