माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राऊत यांची थदाळे शाळेस भेट : विद्यार्थी व शिक्षकांशी साधला संवाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जुलै २०२२ । माण । माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. माणिकजी राऊत साहेब यांनी वावरहिरे केंद्रातील थदाळे शाळेस मार्गदर्शनपर भेट दिली. सोबत साधन व्यक्ती श्री. महानवर सर होते. प्रत्यक्ष शाळा भेटीद्वारे शिक्षकांशी संवाद साधून माण तालुक्यातील शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न समजून घेण्यासाठी तसेच आवश्यक तेथे शिक्षकांना मार्गदर्शन करून माण तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी राऊत हे मार्गदर्शनपर शाळाभेटी करत आहेत. भेटीदरम्यान साहेबांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.सतिश शिंदे सर यांनी शाळेत राबवित असलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. तसेच राऊत यांनी शिक्षकांशी संवाद साधला. शालेय कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी तसेच शासनाच्या विविध उपक्रमाविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक धनंजय शिंगटे यांनी शाळेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी राऊत यांचा सत्कार केला व शाळेतील सर्व शिक्षकांनी लोकसहभागातून केलेला शैक्षणिक उठाव व ग्रामपंचायतीच्या माध्यामातून केलेला शाळेचा भौतिक विकास याविषयी सविस्तर माहिती दिली.तसेच राऊत यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शाळा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील राहील असे आश्वासन शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने दिले.


Back to top button
Don`t copy text!