खुनाच्या प्रयत्न प्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व १.१० लाखांचा दंड


स्थैर्य, सातारा, दि. ८ ऑक्टोबर : जमिनीच्या वादातून एका ७० वर्षीय व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, सातारा जिल्हा न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संतोष राजाराम जाधव (वय ४५, रा. गणेशवाडी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना २५ जुलै २०१८ रोजी सातारा तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली होती. जमिनीच्या वादातून संतोष जाधव याने मारुती तात्याबा साळुंखे (वय ७०) यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. साळुंखे यांचा मृत्यू झाला असे समजून जाधव मृतदेह ओढ्यात टाकण्यासाठी घेऊन जात असताना, गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि साळुंखे यांचे प्राण वाचले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-१ यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला, ज्यामध्ये ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपी संतोष जाधव याला दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास आणि १ लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये फिर्यादी मारुती साळुंखे यांना देण्यात येणार आहेत.

या गुन्ह्याचा यशस्वी तपास आणि न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बोरगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे आणि सरकारी वकिलांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!