दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । सातारा । सातार्यातील फोडजाई मंदिरासमोर मोकळ्याजागेत आईसोबत झोपलेल्या चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर सोनगाव, ता. सातारा येथील पॉलिटेक्नीक कॉलेजजवळील निर्जन भागात अत्याचार करून पळून जाणार्या नराधमास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून एलसीबी व शहर व तालुका पोलिस ठाण्याची पथके आरोपीच्या मागावर होती तर आरोपी दुसर्या एका गुन्ह्यात पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होवून न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही प्रसारीत केल्यानंतर गुन्ह्याचा छडा लागला.
याबाबत माहिती अशी, दि. 21 रोजी पहाटे 05 च्या सुमारास अज्ञात इसमाने सातारा शहरातील फोडजाई मंदिरासमोर मोकळ्या जागेत आईसोबत झोपलेल्या 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला मोटार सायकवरुन घेवून जावून तिच्यावर शाररीक अत्याचार केले व तिला सोनगाव, ता. सातारा येथील पॉलिटेक्नीक कॉलेजजवळील निर्जन भागात सोडून पळून गेला होता. या घटनेनंतर सातारा शहरात तीव्र संताप व्यक्त होवू लागला होता.
दरम्यान, अमित गणपती पाटील पोलीस उपनिरीक्षक सातारा तालूका पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा तालूका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलिस व तालुका पोलिसांना आरेापीस तातडीने अटक करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलीस ठाणे , तालूका पोलीस ठाणे येथील तपास पथके आरोपीच्या शोधकामी रवाना झाली. तपास पथकांनी पिडीत अल्पवयीन मुलीचे ज्या ठिकाणावरुन अपहरण झाले त्या ठिकाणापासून ती ज्या ठिकाणी मिळून आली त्या ठिकाणापर्यंतचे तसेच सातारा शहरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित इसम मोपेड गाडीवरुन जाताना दिसला. फुटेजमधील इसमाबाबत पिडीत अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांकडे विचारपुस केली असता दि.19 रोजी रात्री 10.30 वा.चे. सुमारास नमुद इसमाने पोवईनाका येथे मुलीच्या नातेवाईकांशी भांडण केल्याचे सांगीतले होते. त्याप्रमाणे नमुद फुटेजमधील संशयित इसमाचा शोध घेण्याचा तपास पथकाने प्रयत्न केला. परंतू काही उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.
दि. 22 रोजी रात्री 20.00 वा . संशयित इसमाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आले होते. तसेच सदरचे फुटेज बातमीदार लोकांनादेखील दाखविण्यात आले. तरीदेखील नमुद इसमाबाबत काहीएक उपयुक्त माहिती प्राप्त झाली नाही.
दि. 24 रोजी संशयित इसमाच्या वडीलांनी व भावाने सोशल मिडीयावर प्रसारीत केलेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले. फुटेजमधील इसमास त्याच्या वडीलांनी ओळखून तो त्यांचा मुलगा असल्याचे सातारा शहर पोलीस ठाण्याला फोन करुन सांगितले. पोलिसांनी त्यानुसार आरेापीची माहिती घेतली असता आरोपीने दि. 21 रोजी हा गुन्हा केल्यानंतर शाहुपूरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394 या गुन्हयात स्वतःहून हजर झाला होता. त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने तो जिल्हा मध्यवर्ती कारागृह सातारा येथे न्यायालयीन कोठडीमध्ये होता. त्यास आज दिनांक 25 रोजी सातारा तालुका पोलीसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हयाच्या तपासकामी न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेवून चौकशी केली असता गुन्हा केला असल्याचे सांगितले.