स्थैर्य, सातारा, दि.२१: कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्टल विक्री करणार्यास आलेल्या एकास शिताफीने जेरबंद करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार मॅगझीन आणि 30 जीवंत काडतूस हस्तगत केली. शुभम प्रकाश ढवळे, वय 27 रा. दत्त हाऊसींग सोसायटी, आगाशिवनगर कराड असे संशयीताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, कराड येथील ढेबेवाडी फाटा येथे एकजण गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीस येणार असल्याची खात्रीशीर माहिती सातारा एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सुचनेनुसार तात्काळ ढेबेवाडी फाटा येथे एलसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक इसम संशयीतरित्या फिरताना अढळून आला. त्याचा संशय आल्याने त्यास पथकाने हटकले असता त्याने हुलकावणी देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यास पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टीच्या खिशात जिवंत काडतूस तसेच त्याचे हातातील पिशवीमध्ये आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल असे एकूण दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतूस व एक मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 37 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, स.फौ. पृथ्वीराज घोरपडे, पोहवा विनोद गायकवाड, पोना मोहन नाचण, शरद येवले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, पोशि मयुर देशमूख, मोहसिन मोमीन, चापोना संजय जाधव यांनी केली.