स्थैर्य, कोलकाता, दि. ९: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, तसेच साठेबाजांवर कारवाई करावी आणि पुरवठा वाढवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करा, अशी मागण्या ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केल्या आहेत. बटाटा आणि कांद्यासारख्या आवश्यक खाद्यपदार्थांच्या किंमतीवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे आणि तसे अधिकार राज्याला द्यावेत, अशीही मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना ४ पानी पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात ममता बॅनर्जी लिहितात, ‘साठेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी, पुरवठा वाढवण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहेत. यासाठी तत्काळ पावले उचलत राज्यांना शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे. कृषी उत्पादने, पुरवठा, वितरण आणि विक्रीवर नियत्रण येणे आवश्यक आहे. असे नियंत्रण आणता यावे यासाठी राज्यांनी कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.
आपल्या पत्रात ममता बॅनर्जी पुढे म्हणतात, ‘राज्य सरकारला अशी शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे आणि राज्य सरकार सामान्य जनतेच्या समस्यांकडे पाहत मूक दर्शक बनून राहू शकणार नाही. याचे कारण म्हणजे बटाटा आणि कांद्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत आहेत.’
संसदेने २३ सप्टेंबर या दिवशी आवश्यक खाद्य पदार्थ (दुरुस्ती) विधेयत पारित करत, धान्य, डाळ, तेलबिया, खाद्यतेल, कांदे आणि बटाटा अशा पदार्थांना आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते.